
नायगांव, रामप्रसाद चन्नावार। अखिल भारतीय प्राध्यापक महासंघाच्या 28 जानेवारी,2023 च्या परिपत्रकानुसार उच्च शिक्षण क्षेत्राच्या व प्राध्यापकांच्या विविध प्रलंबित मागण्याच्या अनुषंगाने विद्यापीठ अनुदान आयोग व संबंधीत राज्य सरकार यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी देशभरातील विद्यापीठे व महाविद्यालयातील प्राध्यापकांनी दि 14 फेब्रूवारी,2023 रोजी काळ्या फिती लावून आंदोलन करण्याबाबतच्या सुचनेनुसार येथील शरदचंद्र महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापिका यांनी काळ्या फिती लावून आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत.

यासंबंधी स्थानिक मुक्टाचे सचिव प्रा.अमितकुमार पाण्डेय यांनी एआयफुक्टोनी शासनदरबारी केलेल्या मागण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. नवीन शैक्षणिक धोरण 2020, परकीय विद्यापीठाचा शिरकाव, अर्थसंकल्पात शिक्षणावरील खर्चात कपात, शिक्षणाचे खाजगीकरण, व्यावसायिकरण आणि शिक्षणात धर्माचा शिरकाव या सारख्या अनेक बाबी शिक्षणासाठी अडथळा निर्माण करणाऱ्या असून शैक्षणिक हक्क हिरावून घेणाऱ्या आहेत तसेच जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, कॅससाठी पीएचडी बंधनकारक असू नये, कायमस्वरूपी प्राध्यापकांची व प्रशासकीय कर्मचाऱ्याची भरती करण्यात यावी.

अनुजाती, जमाती, ओबीसी व इतर आर्थिक मागास घटकाची पुर्णपणे अंमलबजावणी करण्यात यावी यासह अन्य अनेक मागण्यासाठी अखिल भारतीय प्राध्यापक महासंघाने केलेल्या आवाहनास पूर्णपणे प्रतिसाद देत महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक काळ्या फिती लावून आंदोलनामध्ये सहभागी झाले. यावेळी स्थानिक मुक्टाचे अध्यक्ष प्रा.डॉ. वैभव कवडे, सचिव प्रा. अमितकुमार पाण्डेय, जिल्हा प्रतिनिधी प्रा.डॉ. महानंदा राऊतखेडकर यांच्यासह सर्व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.

