
उस्माननगर, माणिक भिसे। आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा 2022 ते 23 चा निकाल नुकताच लागलेला असून यामध्ये उस्मान नगर तालुका कंधार येथील समता माध्यमिक विद्यालय इयत्ता आठवी वर्गात शिकणारे एकूण 12 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत सदर मुले उत्तीर्ण झाल्याने विद्यालयाच्या यशस्वी परंपरा कायम राहिली असून आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी या योजनेमार्फत पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे . सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्था व शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांसह पालकांचा येथे सन्मान करण्यात आला.

समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय उस्माननगर ता. कंधार येथील विद्यार्थ्यांची विविध परीक्षांमध्ये नेहमी घोडदौड चालूच असते. नुकताच जाहीर झालेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना अंतर्गत घेण्यात आल्यास स्पर्धा परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे संचालक व माजी मुख्याध्यापक शामसुंदर जहागीरदार गुरुजी हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक गोविंद बोदेमवाड हे होते. सर्वप्रथम विद्येची देवता सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रमुख उपस्थित मान्यवरांचा पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले.

त्यानंतर गुणवंत विद्यार्थीसह पालकांचा सन्मान करण्यात आला.या स्पर्धा परीक्षेत अभिजीत घोरबाड या विद्यार्थ्याने 87% गुण मिळून सर्वप्रथम येण्याचा बहुमान मिळवला. केवळ 22 दिवसात शिक्षकांनी या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची तयारी केली होती. या स्पर्धेमध्ये कृष्णा अवलवार, सम्यक कांबळे, रूपाली सोनसळे, लक्ष्मीकांत सूर्यवाड, निखिल झडते, कृष्णा सोनटक्के , यांच्यासह पालकासह विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला मुख्याध्यापक गोविंद बोधेवाडी यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले. यावेळी ते म्हणाले की विद्यार्थ्यांनी चिकाटी, जिद्द, मेहनत, करून पुढील ध्येय डोळ्यासमोर ठेवून यश संपादन करावे असे आवाहन केले.

अध्यक्ष समारोप करताना माजी मुख्याध्यापक श्यामसुंदर जागीरदार गुरुजी म्हणाले की जीवन यशस्वी होण्यासाठी परिश्रमाबरोबर योग्य नियोजन असणे गरजेचे असते प्रशासकीय सेवा असो किंवा अन्य कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी विरोधात कोण आहे हे न पाहता शेवटच्या टोकाचे ध्येय गाठण्याची क्षमता मेहनत चिकाटीने अभ्यास करा निश्चित यश तुमचेच आहे असे प्रतिपादन यावेळी केले. यावेळी पालकाकडून लाट खुर्द येथील संदीप घोरबांड गणेशराव लोखंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे विद्यार्थिनी रूपाली सोनसळे हिने केले. कार्यक्रमास शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राम पवार, मारुती गोरे ,बालाजी भिसे यांनी परिश्रम घेतले.

