
नांदेड| येथील सप्तरंगी साहित्य मंडळाच्या दुसऱ्या एकदिवसीय जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनातील समारोप सत्रात ठराववाचन करण्यात आले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची कार्यवाही पूर्ण झाली असून याबाबतची घोषणा त्वरीत करावी हा सर्वमतांनी मंजूर करुन एकूण वीस ठराव या संमेलनात मंजूर करण्यात आले.

यावेळी संमेलनाध्यक्ष डॉ. राम वाघमारे, सुप्रसिद्ध साहित्यिक बाबुराव पाईकराव, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते तथा अभ्यासक सुधाकर पंडित, साहित्यिक समीक्षक प्रज्ञाधर ढवळे, सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्याध्यक्ष नागोराव डोंगरे, पांडूरंग कोकुलवार, कैलास धुतराज, शंकर गच्चे, जिल्हाध्यक्ष रणजित गोणारकर, प्रकाश ढवळे नागलगांवकर, रुपाली वागरे वैद्य, साईनाथ रहाटकर, गौतम कांबळे आदींची उपस्थिती होती.

राजर्षी शाहू महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या वतीने जवळा देशमुख येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत जनसंवाद एकदिवसीय ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाच्या समारोप सत्रात कार्यवाह प्रज्ञाधर ढवळे यांनी २० ठराव मांडले ते सर्वांनी एकमताने मंजूर केले. ठराव पुढील प्रमाणे – १) मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची कार्यवाही पूर्ण करुन त्वरित घोषणा करावी २) म. फुले, सावित्रीमाई फुले, अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा. ३) अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला देण्यात येणाऱ्या ५० लाखांपैकी काही रक्कम ग्रामीण भागात भरणाऱ्या साहित्य संमेलनाला देण्यात यावी, ४) नांदेड जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीने ग्रामीण साहित्य संमेलनाला निधी उपलब्ध करून द्यावा,

तसेच ५) ग्रामीण भागातील साहित्य चळवळ आणि साहित्यिकांच्या दर्जेदार साहित्याची साहित्य अकादमीने दाखल घ्यावी, ६) वयोवृद्ध साहित्यिक, कलावंत याना विना अट रु. १०, ००० मानधन द्यावे. ७) त्यासाठी महाकवी वामनदादा कर्डक आर्थिक महामंडळाची स्थापना करावी , ८) बोली भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी काही नवीन प्रकल्प हाती घ्यावेत, ९) जिल्हा परिषद तथा मनपाच्या धर्तीवर तालुक्याच्या ठिकाणी ग्रंथोत्सव भरविण्यात यावा, १०) ग्रामीण भागातील माध्यमिक,

उच्च माध्यमिक तथा पदवी महाविद्यालयांना साहित्य संमेलने भरविण्यास शासनाने उत्तेजन द्यावे, ११) शेती मालाला हमी भाव जाहीर करावा आणि तो चार महिन्याच्या आत खरेदी करण्याची व्यवस्था करावी १२) मराठ्यांना ओबीसी कोट्यातुनच आरक्षण द्यावे १३) राज्याच्या सीमावर्ती भागातील मराठी भाषकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य द्यावे १४) कवी नामदेव ढसाळ यांना महाराष्ट्र भूषण आणि सम्राटचे संपादक बबन कांबळे यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर करावेत असे एकूण वीस ठराव मंजूर करण्यात आले.

