
मुदखेड/नांदेड। महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी),पूणे समतादूत प्रकल्पाच्या माध्यमातून मुदखेड तालुक्यातील वंचित घटकांतील पाल्यांसाठी आरटीई अंतर्गत सर्वेक्षण व ऑनलाइन अर्ज भरणा करण्याला सुरुवात झालेली असून जास्तीत जास्त गरजू पालकांनी आपल्या पाल्याच्या मोफत शिक्षणाकरीता या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका समतादूत ऍड. राणीपद्मावती परमेश्वर बंडेवार यांनी केले आहे.

सविस्तर वृत्त असे की,Right To Education (RTE) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम – २००९ या कायद्याअंतर्गत वंचित घटकांतील पाल्यांसाठी इंग्रजी माध्यमातून नर्सरी, ज्यूनिअर केजी,पहिली ते आठवी पर्यंत वर्गासाठी मोफत शिक्षण देण्यात येत आहे. यासाठी कुठलेही शुल्क नाही. अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गासाठी उत्पनाच्या दाखल्याची गरज नसून खुल्या वर्गासाठी वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आतील असावे, प्रवेश यादी नुसारच प्रक्रिया होणार असल्याने त्यामाध्यमातून पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत इंग्रजी किंवा मराठी माध्यमाच्या शाळेत मोफत प्रवेश दिला जाणार आहे.

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत २५% आरक्षित जागेवर आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकांसाठी आरक्षित असून येत्या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत.ज्यामध्ये – रहिवाशी पुरावा म्हणून आधार कार्ड, पासपोर्ट,निवडणुक ओळखपत्र,वीज बील,घरपट्टी , कर भरणा पावती, पाणीपट्टी, वाहन चालवण्याचा परवाना या पैकी एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे.

तसेच,पाल्याचा जन्माचा दाखला,पाल्याचे पासपोर्ट साईज़ रंगीत फोटो, पालकाचा जातीचा दाखला (अनुसूचित जाती-जमाती या प्रवर्गासाठी),एक लाखाच्या आतील उत्पनाचा दाखला (सर्वसाधारण व ईतर मागास प्रवर्गासाठी) आदी कागदपत्रे लागणार आहेत.सदरच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने https://rte25admission.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex या संकेत स्थळावर उपलब्ध असून बार्टीच्या समतादूत प्रकल्पाकडून अर्ज भरणा करण्यात येत आहे यासाठीची दिनांक २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी),पूणे च्या समतादूत प्रकल्पामार्फत वंचित घटकांतील,गोर-गरिबांची पाल्य इंग्रजी माध्यमातून शिक्षण घ्यावीत या मुख्य उद्देशातूनच मुदखेड शहर व तालुक्यातील सर्वच गांव,वाडी-तांडे,वस्त्यांवर तसेच, त्याठिकाणी असलेल्या अंगणवाडी केंद्रांवर यासाठी व्यापक प्रचार,प्रसार व सर्वेक्षण सुरु आहे.कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता व कोणत्याही मध्यस्थासोबत आर्थिक व्यवहार न करता तालुक्यातील वंचित घटकांतील जनतेने बार्टीच्या माध्यमातून या योजनेचा लाभ घेऊन आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन बार्टीच्या तालुका समतादूत ऍड. राणीपद्मावती परमेश्वर बंडेवार यांनी केले आहे.

