
नांदेड। बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नागरी प्रकल्प क्रमांक एक गणेश नगर नांदेड अंतर्गत खुदबई नगर बीटमध्ये आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्रमुख पाहुणे हैदरबाग येथील वैद्यकीय अधिकारी श्रीमती डॉ.महेंद्रकर, बालविकास प्रकल्प अधिकारी विजय बोराटे हे उपस्थित होते.त्यानिमित्ताने अंगणवाडीतील मुलांनी पारंपारिक वेशभूषा परिधान करून रॅली काढण्यात आली.तसेच तृणधान्यापासून बनवलेल्या पदार्थाचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.या प्रदर्शनामध्ये बाजरीचे धपाटे ,भाकरी ,राजगिरा व भगरीचे लाडू, राजगिऱ्याच्या पिठाचा हलवा, नाचणी बाजरी व ज्वारीच्या मिश्र पिठाची भाकरी, राजगिऱ्याचे लाडू, बाजरीच्या पिठाचे अनारसे, बाजरीचा शिरा, ज्वारीचे धिरडे, बाजरीच्या पुऱ्या, ज्वारीचा शिरा, ज्वारीचे कांदे भजे, ज्वारीचे पापड व बाजरीचे शंकरपाळे या पदार्थांचा समावेश होता.

बालविकास प्रकल्प अधिकारी बोराटे यांनी मुलांना टोस्ट ,ब्रेड, बिस्किटे, कुरकुरे ,पिझ्झा बर्गर ऐवजी तृणधान्यापासून बनविलेले पदार्थ खाऊ घालण्याचे आवाहन विभागातील उपस्थित महिलांना केले. डॉ. महेंद्रकर यांनी अंगणवाडीच्या माध्यमातूनच खरी जनजागृती होते असे सांगितले. या कार्यक्रमात कार्यालयातील मुख्यसेविका श्रीमती सावंत, गुंडारे, राहेगावकर व शिसोदे या उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खुदबेनगर विभागातील सर्व सेविका व मदतनीस यांनी अथक परिश्रम घेतले .

