
नांदेड| खरा भारत खेड्यांमधून दिसतो. देशातील अनेक गावे डिजिटल होत चालली आहेत. परंतु गावपातळीवरील समस्या अजूनही कायम आहेत. सर्वात जास्त समस्या निवडणुकीनंतर लोकांमध्ये निर्माण झालेल्या कट्टर मतभेदांमुळे जन्माला येतात. आपापसांतील मतभेद दूर झाल्यास गावांचा विकास शक्य आहे, असा सूर परिसंवादातील वक्त्यांनी लावला. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार संतोष पांडागळे हे होते. तर परिसंवादात वक्ते म्हणून जिल्हा परिषदेचे माध्यम प्रमुख मिलिंद व्यवहारे, सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. विलास ढवळे तसेच सरपंच प्रतिनिधी साहेबराव शिखरे, रिपब्लिकन योध्दा भगवान ढगे यांची उपस्थिती होती.

राजर्षी शाहू महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या वतीने जवळा देशमुख येथे आयोजित सप्तरंगी साहित्य मंडळाचे दुसरे जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलन भरले होते. ‘ग्रामजीवनातील समस्या आणि पत्रकारिता’ या विषयावर बोलताना मिलिंद व्यवहारे म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चालवलेल्या सर्व लोकोपयोगी योजनांचा पुरेपूर लाभ ग्रामीण भागातील लोकांनी घेतला पाहिजे, तसेच महिलांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करु नये. शासनाच्या सर्व आरोग्यविषयक योजनांचा लाभ घेतला पाहिजे असेही ते म्हणाले.

डॉ. विलास ढवळे म्हणाले की, शिक्षण हाच सर्व समस्यांवर उपाय आहे. मुलामुलींना उच्च शिक्षण देणे गरजेचे आहे. शिक्षण हे सर्वांगीण विकासाचे महाद्वार आहे. अध्यक्षीय समारोप करताना संतोष पांडागळे म्हणाले की, ग्रामीण भागातील समस्यांना आजच्या माध्यमांनी प्रथम प्राधान्य द्यावे. ग्रामीण लोकांना राजकीय शहाणपण आले पाहिजे. वैचारिक मतभेद व्हावेत पण मनभेदांमुळे गावचा विकास खुंटतो, हे लक्षात घेतले पाहिजे.

परिसंवादाचे सूत्रसंचालन रणजीत गोणारकर यांनी केले तर आभार शंकर गच्चे यांनी मानले. या सत्राच्या यशस्वीतेसाठी स्वागताध्यक्ष राहुल देशमुख, संयोजन समितीचे अध्यक्ष गोविंदराव देशमुख, कार्यक्रम समितीचे अध्यक्ष अंबादास देशमुख, मुख्य संयोजक भैय्यासाहेब गोडबोले, कार्यवाह प्रज्ञाधर ढवळे, सप्तरंगी साहित्य मंडळाचे अध्यक्ष नागोराव डोंगरे, सचिव कैलास धुतराज, प्रकाश ढवळे नागलगांवकर, पांडूरंग कोकुलवार, रुपाली वागरे वैद्य, आनंद गोडबोले, मिलिंद गोडबोले, धम्मपाल गोडबोले, बाबुराव पाईकराव यांच्यासह राजर्षी शाहू महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान व सप्तरंगी साहित्य मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

