हिमायतनगर| शहरात दि. १५ फेब्रुवारी रोजी बंजारा समाजाचे आराध्य दैवत क्रांतिकारी सदुरु संत सेवालाल महाराज यांच्या २८४ व्या जयंती निमित्ताने भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. रेल्वे स्टेशन बंजारा कॉलनी येथून काढ्यात आलेल्या सेवा ध्वज मिरवणूक शहरातील मुख्य रस्त्याने निघालेली मिरवणूक गुरुकुल इंग्लिश स्कूलच्या मैदानात आल्यानंतर संत सेवालाल महाराज जयंती सोहळा थाटात संपन्न झाला. यावेळी सवाल महाराज कि जय च्या नामघोषाने हिमायतनगर शहर व परिसर दणाणून निघाला. या शोभायात्रेत हजारोच्या संख्येने बंजारा समाज बांधव उपस्थित झाले होते.
प्रतिवर्षप्रमणे याही वर्षी हिमायतनगर शहरात संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. गेल्या दोन वर्षाच्या कोरोना काळानंतर जयंती थाटात साजरी होणार असल्याने जयंती सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते. याची सुरुवात हिमायतनगर शहरातील रेल्वे स्टेशन बंजारा कॉलनीमध्ये सेवा ध्वज येथून करण्यात आली. या जयंतीमध्ये गोर बंजारा वेशभूषेत, बैलगाडीमध्ये सेवालाल महाराज यांच्या तैलचित्राची शोभायात्रा काढण्यात आली होती. संत सेवालाल महाराज यांच्या कार्याची व त्यांच्या शिकवणीची सर्वांना माहिती व्हावी. या उद्देशाने हा जयंती सोहळा आयोजित
कण्यात आला होता.
जयंती मिरवणूक येताच शहरातील चौकाचौकात संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अनेक मान्यवरांनी अभिवादन केले. त्यानंतर जयंती मिरवणूक मुख्य रस्त्याने बोरगडी रोडवर असलेल्या गुरुकुल इंग्लिश स्कुल येथे आल्यानंतर अनेक मान्यवरांनी संत सेवालाल महाराज यांच्या कार्याच्या यशोगाथा आपल्या भाषणातून सांगितली. या जयंती सोहळ्यात हिमायतनगर शहरासह तालुक्यातील वाडी, तांड्यातील सर्व समाज बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थिती लावली होती.
वर्धमान मेन्स तर्फे संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त बुंदीच्या लाडूचे वितरण
हिमायतनगर शहरात संत सेवालाल महाराज यांची जयंती निमित्ताने काढण्यात आलेली मिरवणूक बाजारपेठेत दाखल होताच येथील वर्धमान मेन्स वेअरच्या वतीने मिरवणुकीत सामील झालेल्या सर्वांना बुंदीच्या लाडूच्या प्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी संत सेवालाल महाराज की जय… नावाचा एकच जयजयकार करण्यात आला. वर्धमान मेन्स वेअरच्या या अमाजिक उपक्रमाचे सर्वानी भरभरून स्वागत केले.
ठेकेदार व नगरपंचायतचा नाकर्तेपणा; भाविक भक्तांना रस्त्याच्या अडचणीचा करावा लागला सामना
हिमायतनगर नगरपंचायतचा नाकर्तेपणा व नळ योजनेचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे शहरातील रस्ते खोदून ठेवल्यामुळे आज संत सेवालाल महाराज जयंती मिरवणुकीत सामील झालेल्या भाविक भक्तांना रस्त्याच्या अडचणीचा सामना करत जयंती उत्सव साजरा करावा लागला आहे. गेल्या चार वर्षापासून सुरू असलेल्या हिमायतनगर शहरातील यां नळ योजनेच्या कामामूळ सर्वसामान्य माणसाला नरक यातना भोगाव्या लागत आहेत, या खोदलेल्या रस्त्यामुळे अनेकांना आपल्या दुचाकीसह कुटुंबाला घेऊन जाताना अपघाताचा सामना करावा लागत आहे असे असताना देखील या कामांमध्ये ठेकेदाराकडून दिरंगाई केली जात असल्याने केंव्हा रस्ते खोदण्याचा हा प्रकार थांबेल आणि नागरिकांना समस्येपासून सुटका मिळेल असा प्रश्न विचारला जातो आहे.