
शीख समाजातील मुरब्बी राजकारणी म्हणून ख्याती प्राप्त सरदार इंदरजीतसिंघ गल्लीवाले यांचे दि. 5 फेब्रुवारी 2023 रोजी निधन झाले. त्यांच्या निधानामुळे जवळपास पन्नास वर्षाचा एक युग काळाच्या पडद्या आड गेला. शीख समाजातील अनेक प्रश्नांचा पाठपुरावा करणारे आणि सतत समाजान्तर्गत राजकारणावर भाष्य करणारे ते सक्रिय व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी ख्याती मिळवली होती. समाजान्तर्गत राजकारणावर त्यांनी प्रसिद्धिस दिलेले पत्रक (पॉम्पलेट) नेहमीच चर्चेत असायचे. गुरुद्वारा बोर्ड पदाधिकारी आणि नगरसेवक म्हणून त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला. आज हा चर्चित, ध्येयवेडा नेता आपल्यात राहिलेला नाही. त्यांच्या देहावसनाच्या बातमी वाचून समाजाबाहेर देखील हळहळ व्यक्त झाली. त्यामुळे त्यांच्या हुरहुनरी व्यक्तिमतावर प्रकाश टाकावे अशी इच्छा समजातुन व्यक्त होत होती.

सन 1950 च्या 26 जानेवारी रोजी स. इंदरजीतसिंघ गल्लीवाले यांचा जन्म नांदेड शहरातील गुरुद्वारा भोवती शहीदपुरा भागात झाला होता. त्यांचे वडील स्व. रतनसिंघ गल्लीवाले आणि आईचे नाव स्व. मोतीबाई. स्व. रतनसिंघ गल्लीवाले यांच्या पाच मुला आणि दोन मुलींच्या कुटुंबात इंदरजीतसिंघ ज्येष्ठ पुत्र असल्यामुळे साहजिकच त्यांना कुटुंबात सर्वात जास्त लाड व महत्व मिळाले. त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र भाई हरदयालसिंघजी (माजी घागरिया) यांनी देखील गुरुद्वारा तखत सचखंड हजुरसाहिब येथे घागरिया पदावर अनेक वर्षे सेवा केली आणि वडिलांचे नावलौकिक केले.

कॉलेजचे शिक्षण सुरु असतांनाच त्यांना महाराष्ट्र परिवहन महामंडळात वाहक (कंडक्टर) म्हणून नौकरी मिळाली. शहर वाहतूक सेवेत त्यांना अनेक वर्षे काम करण्याची संधी लाभली. त्यांना “हबीब टॉकीज ते गणेश नगर” बस सेवेसाठी मुद्दामहून नेमणूक मिळायची. कारण हबीब टॉकीज ते जूना मोंढा, गुरुद्वारा, शिवाजी पुतळा, कलामंदिर, शिवाजी नगर, नयाबादी आणि गणेश नगर असा हा एसटीचा मार्ग होता. या बस मध्ये कॉलेजचे विद्यार्थी – विद्यार्थिनी प्रवास करायचे. एसटी बस मध्ये फुकट्या प्रवाश्यांवर वाचक बसविण्यात गल्लीवाले यांनी आपला स्वतःचा प्रभाव वापरून दादागिरीला ठेचून काढले होते. तसेच बस मध्ये मुलींची छेड रोखण्यात त्यांनी त्यावेळी कठोर भूमिका घेतली होती. त्यामुळे अनेक पालकांची भावना असायची की गल्लीवाले रुजू असलेल्या बस मध्ये त्यांच्या मुली सुरक्षितपणे प्रवास करू शकतात. म्हणून पालकवर्गाची नेहमीच मागणी असायची की कॉलेज मार्गावर धावणाऱ्या बसेस मध्ये इंदरजीतसिंघ गल्लीवाले किंवा एखादा शीख चालक व वाहकाची नियुक्ती व्हावी. वाहक पदावर त्यांनी शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी एका रक्षकाची भूमिका पार पाडली होती हे उल्लेखनीय म्हणावे लागेल.

पाच – सहा वर्षे वाहक म्हणून जवाबदारी पार पाडल्यानंतर त्यांनी स्वतःचे ट्रांसपोर्ट व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला. शासकीय नौकरी सोडून त्यांनी शेतीकडेही लक्ष्य केंद्रित केले. त्यांना ट्रांसपोर्ट व्यवसायात अपयश आले. त्याच काळी ते गुरुद्वारा बोर्डाच्या राजकारणात उतरले. गुरुद्वारा बोर्डाच्या बर्खास्तीसाठी त्यांनी अनेकवेळी आंदोलनं केली. त्याकाळच्या राजकारणावर त्यांनी प्रसिद्धी पत्रके (पॉम्पलेट) काढून विषयास वाचा फोडण्याचा तंत्र समाजात प्रचलित केला. त्यांना त्यावेळी युवकांचा मोठा पाठिंबाही मिळाला होता. माजी केंद्रीय गृहमंत्री स्व. शंकररावजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनात जोमाने काम केले. स्व. चव्हाण यांनी गल्लीवाले यांच्याकडे कांग्रेस शहराध्यक्ष पदावर जवाबदारी देखील दिली होती.

काही काळ कांग्रेस पक्षात राहिल्यानंतर त्यांनी गुरुद्वारा बोर्ड निवडणूक लढवली पण त्यांना पराभव पत्करावं लागलं. त्या निवडणुकीमुळे स्थानीक शीख समाजान्तर्गत राजकारण उफाळून आले व कांग्रेस पक्षात उभी फूट पडली. निवडणुकीत कांग्रेस पक्षातील काही नेत्यांनी प्रस्थापितांना निवडणुकीत सहकार्य केले गेले आणि त्यामुळेच मला परभावास सामोरे जावे लागले असा ठपका ठेवत गल्लीवाले यांनी कांग्रेस पक्षापासून स्वःताला दूर करून घेतले. नंतर त्यांनी जनता दलात प्रवेश केला. डॉ व्यंकटेश काब्दे यांच्या प्रचारात त्यांनी शीख समाजात व बाहेर देखील मोठी भूमिका पार पाडली होती. त्यांनी नंतर गुरुद्वारा बोर्डाची निवडणूक जिंकून पुन्हा जोमाने आपला राजकीय प्रवास सुरु केला. तसेच पुढे त्यांनी नांदेड महानगर पालिका निवडणूक जिंकून अध्याय रचला. गल्लीवाले यांनी फक्त तीन हजार खर्चात ती निवडणूक जिंकली होती हे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

सन 1991 नंतर स्व. दलबीरसिंघ जाबिंदा (औरंगाबाद) हे गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष झाले आणि गल्लीवाले यांचा त्यांच्याशी नाते कायम झाले. अनेक बेरोजगार तरुणांना त्यांनी गुरुद्वारा बोर्डात नौकरीवर लावण्यात हातभार लावले. शीख समाजात एक सक्रिय नेते म्हणून त्यांना ख्याती लाभली. त्यावेळी स. लड्डूसिंघ महाजन, स. शेरसिंघ फौजी, स. वरियामसिंघ नवाब, स्व. भुजंगसिंघ गाडीवाले, स्व. अमरसिंघ बुंगाई, स्व. दलबीरसिंघ जाबिंदा, प्राचार्य मदनमोहनसिंघ खालसा सह मोठी दिग्गज मंडळी राजकारणात सक्रिय होती पण गल्लीवाले यांनी स्वःताचे वेगळे स्थान कायम करण्यात यश मिळवले. अनेक वेळा त्यांचा सामना वादाशी झाला. त्यांच्यावर राजकीय हेतूने जीवघेणे हल्ले ही झाले. गोदावरी शुद्धिकरणासाठी त्यांनी अनेकवेळा आंदोलनं केली. शेवटच्या काही वर्षात गुरुद्वाराच्या राजकारणात त्यांची पतछड झाली. मागील दोन निवडणुकात त्यांनी स्वतःस दूर ठेवले होते. शेवटी आजारपणा मुळे त्यांनी जगाचा निरोप घेतला. दि. 15 फेब्रुवारी रोजी त्यांची तेरवी असून श्री गुरु ग्रंथसाहेबांचे पाठ, कीर्तन व इतर कार्यक्रम ठेवण्यात आले आहे. यावेळी समाजजेवण कार्यक्रम होत आहे. यानिम्मीत त्यांच्या व्यक्तिमतवास हार्दिक श्रद्धांजलि अर्पित करतो.

लेखक ….रविंद्रसिंघ मोदी, 9420654574.
