
परभणी| मागील काही वर्षांपासून शहरी भागात असलेले वॅलेनटाईन-डे चे लोण आता लहान शहरातील युवक–युवती मध्ये सुद्धा पोहोचलेले दिसते. प्रत्यक्षात वॅलेनटाईन-डे च्या नावावर आजचा युवा वर्ग अयोग्य मार्गावर जात असलेला दिसत आहे आणि हाच धोका लक्षात घेवून हिंदु जनजागृती समितीतर्फे प्रबोधन अभियान राबवले जाते. यामाध्यमातून केवळ युवा वर्गच नाही तर प्रत्येकामधे आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटावा अशा कृती कशा कराव्यात याविषयी सांगितले जाते.

या अभियानंतर्गत परभणी येथील आकाश कन्या कल्पना चावला प्राथमिक शाळेने एक स्तुत्य असा मातृ- पितृ पूजनाचा उपक्रम राबवला. याप्रसंगी विद्यालयात हिंदु जनजागृती समितीतर्फे श्री. श्रीनिवास दिवाण यांनी व्हॅलेन्टाईन-डे विषयी प्रबोधन आणि मातृ- पितृ पूजनाची आवश्यकता याविषयी उपस्थित शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांना माहिती दिली.

याप्रसंगी जमलेल्या विद्यार्थी, पालक यांनी येथून पुढे 14 फेब्रुवारी या दिवशी मातृ-पितृ पूजन दिवस म्हणून साजरा करण्याचा संकल्प केला. कार्यक्रमास शाळेतील संचालिका सौ मोगरेकर यांनी सांगितले की दरवर्षी असे उपक्रम आम्ही घेत असतो. वॅलेनटाईन-डे निमित्त होणारे संस्कृतीचे अधःपतन थांबावे, यानिमित्ताने होणारे गैरप्रकार थांबवण्यासाठी प्रशासनाकडून योग्य ती पावले उचलली जावीत यासाठी नांदेडचे मा.जिल्हाधिकारी श्री. अभिजीत राऊत आणि उपशिक्षणाधिकारी श्री. अवधूत गंजेवार यांनासुद्धा जागृत धर्मप्रेमींच्या हस्ते हिंदु जनजागृती समिति तर्फे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी अधिवक्ता जगदीश हाके, डॉ. नारलावार, श्री. राधाकृष्ण पांपटवार, श्री. बजरंग रघुजीवार हे उपस्थित होते.

