
नांदेड/हिमायतनगर। नगदी रक्कम देण्याचे अमिष दाखवून सोयाबीन, हरभरा, तूर, कापूस आदी शेतमाल घेऊन रक्कम न देता शेतकऱ्यांना तब्बल १७ लाख ९३ हजार १९६ | रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार मौजे सिरंजनी येथे उघड झाला आहे. याप्रकरणी हिमायतनगर पोलीस ठाण्यात पसार झालेल्या व्यापाऱ्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुमच्या शेतीमालाला चांगला भाव देतो असे अमिष दाखवून मौजे सिरंजनी ता. हिमायनगर येथील अनेक शेतकऱ्यांना काही स्वयंघोषीत व्यापाऱ्यांनी विश्वासात घेतले. या अमिषाला बळी पडून अनेक शेतकऱ्यांनी दि. २५ जानेवारी ते २३ जून २०२२ या कालावधीत सोवाबीन, हरभरा, तूर, कापूस, हळद व इतर भुसार माल या व्यापाऱ्यांना विकला. प्रारंभी या व्यापाऱ्याने शेतकऱ्यांना शेतीमालाची काही रक्कम वेळेवर दिले. यानंतर राहिलेली रक्कम देण्यास टाळाटाळ सुरू केली. दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांनी तब्बल १७ लाख ९३ हजार १९६ रुपयांचा शेतीमाल या व्यापाऱ्याला विकला.

परंतू अनेक वेळा ही रक्कम मिळावी यासाठी शेतकऱ्यांनी या व्यापाऱ्यांकडे तगादा लावला होता. प्रारंभी टाळटाळ करणाऱ्या व्यापाऱ्याने आपला मोबाईल बंद करून ठेवला. त्यामुळे शेतकऱ्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच थेट हिमायतनगर पोलीस ठाणे गाठले. येथे आपल्या सोबत झालेल्या प्रकाराची माहिती देऊन स्वयंघोषित व्यापाऱ्याविरुद्ध फिर्याद दिली. याप्रकरणी पंजाबराव सदानंद राऊत रा. सिरंजनी यांच्या फिर्यादीवरून संबंधित व्यापाऱ्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सपोनि चौधरी हे करीत आहेत.

