नांदेड| बाराबलुतेदार हा येथील समाजव्यवस्थेने बांधलेल्या दोरखंडामुळे त्रस्त आहे. दुःखाने ग्रस्त आहे. त्याच्या प्रगतीचे सर्व मार्ग बंद केलेले आहेत. अशा अवस्थेत लेखक अशोक कुबडे यांनी महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गावरून चालत बाराबलुतेदारांचे दुःख आणि त्यांना समजून घेत त्यांना दिशा दाखविण्याचे काम आपल्या ‘गोंडर’ या कादंबरीतून केले आहे असे उद्गार प्रसिद्ध विचारवंत व समीक्षक डॉ. प्रल्हाद लुलेकर यांनी काढले.
इसाप प्रकाशनाने प्रकाशनासाठी सिद्ध केलेल्या व अशोक कुबडे लिखित ‘गोंडर’ कादंबरीचा प्रकाशन समारंभ नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रल्हाद लुलेकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रांताध्यक्ष कल्याण दळे, डॉ. राजेंद्र गोणारकर, शंकर वाडेवाले, डॉ. श्याम तेलंग व लेखक अशोक कुबडे व रामचंद्र कुबडे हे व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी संत सेनामहाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
मान्यवरांच्या स्वागतानंतर प्रकाशक दत्ता डांगे यांनी प्रास्ताविकात इसाप प्रकाशनाची भूमिका सांगितली. यानंतर कल्याण दळे यांच्या हस्ते ‘गोंडर’ कादंबरीचे प्रकाशन झाले. मनोगतात कादंबरीकार अशोक कुबडे यांनी गावगाड्यात नाभिक समाज उपेक्षित राहिला आहे. कष्ट करूनही वाट्याला गोंडरच आले आहे. त्यांचे दुःख या कादंबरीतून मांडले आहे असे सांगितले. डॉ. लुलेकर पुढे म्हणाले की, संस्कृती घडविण्याचे काम बाराबलुतेदारांनी केले आहे. म. फुले व डॉ. बबासाहेब आंबेडकर यांनी बाराबलुतेदारीबाबत परिवर्तनाची क्रांतिकारी भूमिका घेतली. त्यांच्यावरील अन्याय दू करण्यासाठी झटले. पूर्वी बलुतेदारांच्या संतांनी त्यांच्या हितासाठी काम केले असे त्यांनी म्हटले.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना शंकर वाडेवाले म्हणाले की, ग्रामीण भागातील अनेक वास्तव प्रसंग ‘गोंडर’ कादंबरीतून लेखकाने मांडले आहेत. प्रस्थापित समाजव्यवस्थेने बलुतेदारांना त्यांच्या कष्टाचा मोबादला म्हणून गोंडर पदरात टाकून त्यांना दूरच ठेवले आहे. त्यामुळे बलुतेदार हा पिचलेलाच राहिला आहे असे म्हटले. तसेच कादंबरीतील नायकाची धीरोदात्तवृत्ती व संघर्षशीलपणा वाखाणण्याजोगा आहे असेही त्यांनी म्हटले.
डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी ‘गोंडर’ कादंबरीचा सुंदर आढावा घेऊन महत्त्व विशद केले. ते म्हणाले, कादंबरी ही अभिव्यक्तीचे मोठे माध्यम आहे. मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी कथा, कादंबरी, कविता अशा माध्यमाचा उपयोग केला जातो. ‘गोंडर’ कादंबरीतून संपूर्ण समाज उभे करणे तसे सोपे नाही. ते काम लेखक अशोक कुबडे यांनी केले आहे. यासाठी एक दृष्टिकोन लागत असतो. तो त्यांच्याकडे आहे. त्यांना समजून घ्यावयाचे असेल तर ‘गोंडर’ कादंबरी वाचावी लागेल. या लेखकाने पात्रांची हतबलता मोठ्या कुशलतेने मांडली आहे. ‘गोंडर’ ही कादंबरी सत्त्वयुक्त आहे असेही त्यांनी म्हटले.
कल्याण दळे यांनी बाराबलुतेदारांना समाजव्यवस्थेने गावगाड्यात अत्यंत हीन वागणूक दिली आहे. या समाजव्यवस्थेशी लढण्यासाठी बाराबलुतेदारांना एकत्र आणण्याचा मी प्रयत्न करीत आहे. या व्यवस्थेचा बळी आपण आहोत यासाठी नव्या विचारांची पिढी घडवावी लागेल असे सांगून बाराबलुतेदारांवरची ‘गोंडर’ ही सुंदर कादंबरी असल्याचे सांगितले. यावेळी बोलताना डॉ. श्याम तेलंग यांनी आपली पिढी ही वाचनाने घडलेली आहे. पुढची पिढी चांगली घडावयाची असे तर त्यांनाही अवांतर वाचनाची सवय लावावी लागेल असे म्हटले. तसेच ‘गोंडर’ ही वाचनीय कादंबरी असून तिच्यावर एखादा चित्रपट काढण्यात यावा असेही म्हटले.
कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन विद्या जमदाडे यांनी केले तर आभार पंडित पाटील यांनी मानले. कार्यक्रमास प्रा. भगवान अंजनीकर, निर्मलकुमार सूर्यवंशी, प्रा. नारायण शिंदे, आनंद पुपलवाड, आशा पैठणे, विजयकुमार चित्तरवाड, प्राचार्य राम जाधव, शिवा कांबळे, प्रा. डॉ. वैजनाथ अनमुलवाड, प्रा. महेश मोरे, शिवाजी अंबुलगेकर, प्रा. शंकर विभुते, प्रा. व्यंकटी पावडे, विमल शेंडे, भीमराव हटकर, व्यंकटेश काटकर, भगवान बनसोडे, पांडुरंग पुठ्ठेवाड, डी. एन. मोरे खैरकेकर, अनिता जाधव, उषा ठाकूर, प्रा. वंदना मघाडे, ज्योती गायकवाड, प्रा. गजानन सोनोने, बालिका बरगळ, माया तळणकर, रुचिरा बेटकर, रूपाली वागरे-वैद्य, अंजली मुनेश्वर, शंकर माने, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जीवन मांजरमकर, नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष संजय मोगडपल्ले शेख निजाम गवंडगावकर, प्रा. गजानन देवकर आदी उपस्थित होते.