हिमायतनगर, अनिल मादसवार| सबंध महाराष्ट्र – तेलंगणा – कर्नाटक राज्य परिसरात ख्यातीप्राप्त झालेल्या हिमायतनगर (वाढोणा – वारणावती) येथील श्री परमेश्वर देवस्थानच्या यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, सदर यात्रेला दि.१६ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. कोरोना काळानंतर पहिल्यांदाच श्रीच्या यात्रा महोत्सव हर्षोल्हासात संपन्न होणार असून, तमाम भाविक – भक्त, व्यापारी, कलावंत, खेळाडू, भजनी मंडळ व यात्रेकरून हजेली लावून श्री दर्शन व प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीचे विश्वस्त व गावकरी मंडळींच्या वतीने करण्यात आले आहे. सदर यात्रा महोत्सवानिमित्त भरगच्च धार्मिक – सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा व शेतकऱ्यांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात सहभागी होणाऱ्यांसाठी २ लाखाची भव्य बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी वाढोण्याच्या श्री परमेश्वराच्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. सदर यात्रोत्सव हा १५ दिवस चालणार असून, याची सुरुवात दि.१६ फेब्रुवारी पासून होऊन दि.०५ मार्च पर्यंत चालणार आहे. दरम्यान सुरुवातीच्या सात दिवसात काकडा आरती, हरिपाठ, अखंड हरिनाम, ज्ञानेश्वरी व वीणा पारायण सोहळा, कीर्तन, प्रवचनाने सप्ताह साजरा केला जाणार आहे. ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे मुख्य व्यासपीठ हभप.शिवाजी महाराज वडगावकर हे सांभाळणार आहेत. या सात दिवसाच्या कालावधीत नामांकित कीर्तनकारांच्या मधुर वाणीतून उपस्थितांना भक्तीचा मार्ग दाखविला जाणार आहे. दरम्यान माघ कृ.१३ दि.१८ रोजी आलेल्या महाशिवरात्री दिनी मध्यरात्री १२ ते ०३ वाजेच्या दरम्यान श्री परमेश्वराचा अभिषेक सोहळा, महापूजा ट्रस्टचे पदसिद्ध अध्यक्ष मा. तहसीलदार यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. त्यानंतर मंगलमय सोहळ्यात पुरोहितांच्या मधुर वाणीत श्रीचा अलंकार सोहळा पार पडणार आहे. दुसऱ्या दिवसापासून भाविक – भक्तांना अलंकार रुपी श्री परमेश्वराचे दर्शन दि.२३ फेब्रुवारी दहीहंडी काल्यापर्यंत घेता येणार आहे.
त्यानंतरच्या काळात शालेय विद्यार्थ्यांसाठी बडबड गीत, शालेय भाषण, लहान मुलांसाठी फैन्सी ड्रेस स्पर्धा, शालेय विविध गुणदर्शन अश्या सांस्कृतिक व खेळ स्पर्धा संपन्न होणार आहेत. तसेच महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची, यासह विविध कार्यक्रम होणार आहेत. तसेच चिमुकल्या बालकांसाठी सुदृढ बालक स्पर्धा आयोजन करण्यात आले आहे. तसेच भजनी मंडळ व संगीत प्रेमींसाठी भव्य भजन स्पर्धा होणार आहे. भजन स्पर्धेत प्रथम येणाऱ्या मंडळास २१००१ रुपयाचे बक्षीस दिले जाणार आहे. एवढेच नव्हे तर राष्ट्रीय खेळ कब्बडी स्पर्धा होणार असून, प्रथम संघास २१००० रुपयाचे बक्षीस जाहीर काण्यात आले आहे, व कुस्ती शौकिनांसाठी भव्य कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, कुस्ती स्पर्धेत मानाची कुस्ती होणार असून, यात जिंकणाऱ्या मल्लास प्रथम क्रमांकाचे ११००१ रुपयाचे बक्षीस प्रदान करण्यात येणार आहे. तसेच आयोजित स्पर्धांमध्ये सहभागी होणार्या सर्व विजेत्या स्पर्धकांना प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाचे बक्षीस मंदिर समितीने ठरविल्या प्रमाणे दिले जाणार आहे. तर यंदा शेतकऱ्यांसाठी आयोजित करण्यात येणारी पशु प्रदर्शन हि स्पर्धा लंम्पि आजाराच्या संसर्गामुळे रद्द करण्यात आली असल्याचे मंदिर समितीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकार म्हंटले आहे.
महाशिवरात्री यात्रेची पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आली असून, त्या निमित्ताने मंदिर रंग रांगोटी करण्यात आली आहे. यात्रा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी विविध प्रकारच्या १५ समित्यांची स्थापना करण्यात येउन, त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आगामी महाशिवरात्री यात्रा महोत्सवाच्या पर्व काळात सर्व – भाविक भक्तांनी उपस्थित राहून शोभा वाढवावी असे आवाहन मा. तहसीलदार डी.एन.गायकवाड, मंदिर समितीचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी अनंतराव देवकते, संचालक राजेश्वर चिंतावार, लक्ष्मण शक्करगे, प्रकाश शिंदे, संभाजी जाधव, मुलचंद पिंचा, देविदास मुधोळकर, प्रकाश कोमावार, विठ्ठलराव वानखेडे, श्याम पावणेकर, वामनराव बनसोडे, राजाराम झरेवाड, माधव पाळजकर, सौ.लताबाई पाध्ये, सौ.लताबाई मुलंगे, श्रीमती मथुराबाई भोयर, शांतीलाल श्रीश्रीमाळ, एड दिलीप राठोड, अनिल मादसवार, संजय माने, विलास वानखेडे, गजानन मुत्तलवाड, लिपिक बाबुराव भोयर व गावकरी मंडळीनी केले आहे.