
नांदेड| समाजातील विकलांगांसाठी देशभर काम करणाऱ्या भारत विकास परिषद विकलांग पुनर्वसन केंद्र पुणे च्या वतीने नांदेड येथील श्री गुरुजी रुग्णालय येथे पुढील महिन्यात दि.5 मार्च रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत दिव्यांग व्यक्तींचे कृत्रिम मॉड्युलर हात व पायांचे मोजमाप घेतले जाणार असून शिबिराच्या माध्यमातून 200 गरजू दिव्यांग व्यक्तींना मोफत अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर हात व पाय दिले जाणार आहेत. हे शिबीर भारत विकास परिषद, पुणे श्री गुरुजी रुग्णालय व मराठी पत्रकार संघ, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आल्याची माहिती नवभारत विकास फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री दत्ता चितळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.-

येथील श्री गुरुजी रुग्णालय येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला संबोधित करताना श्री चितळे म्हणाले, की महाराष्ट्र नॅचरल गॅस लि.(एम.एन. जि. एल.), गेल इंडिया लि. व बी.पी.सी.एल. यांच्या संयुक्त प्रकल्प सी.एस.आर. सहायता अंर्तगत हे कार्य राबविले जाते आहे. भारत विकास परिषद ही राष्ट्रव्यापी स्वयंसंस्था असून सेवा व संस्कार क्षेत्रात नि:स्वार्थपणे काम करणारी संघटना आहे. सामाजिक दायित्व राखत या संस्थेने 25 वर्षात 20 हजार दिव्यांग बांधवाना मोफत कृत्रिम हात व पाय बसवून दिले आहेत. हे संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्षे असून 2 हजार विकलांग व्यक्तींना मोफत कृत्रिम हात व पाय देण्याचा संकल्प केला असल्याचे श्री चितळे यांनी स्पष्ट केले.

या संस्थेच्या देशभरात 1300 पेक्षा जास्त शाखा आहेत. संपर्क,सहयोग,संस्कार,सेवा व समर्पण या पंचसूत्रीद्वारे संस्था समाज उत्थानाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून कार्य करते. आजघडीला 54 लाख व्यक्ती या हात व पायांनी अपंग आहेत. यात दरवर्षी 40 हजार रुग्णांची भर पडते. या सर्व बाबीचे गांभीर्य लक्षात घेता भारत विकास परिषदेच्या देशभरातील कायमस्वरूपी 13 विकलांग केंद्रातून दरवर्षी 20 हजार विकलांग नागरिकांना अद्यावतपणे मोफत कृत्रिम पाय, हात व कॅलिपर बसविले जात असल्याचे यावेळी श्री चितळे यांनी स्पष्ट केले.

भारत विकास परिषद विकलांग पुनर्वसन केंद्राविषयी बोलताना संस्थेचे विश्वस्त श्री विनय खटावकर म्हणाले की, भारत विकास परिषद, विकलांग केंद्र, पुणेची स्थापना 1997 साली झाली असून, संस्थेकडून पाच वर्षांपूर्वीपर्यंत दिव्यांग व्यक्तींना जयपूर फुटवेअर मोफत दिले जात होते. मात्र आता संस्था स्वतः अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय, हात व पोलिओ कॅलिपर्स सेवा उपलब्ध करून देत असल्याचे त्यांनी सांगितले.

अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय, हात व पोलिओ कॅलिपर्स हे विकलांग केंद्राच्या वर्कशॉप मधे, अत्याधुनिक यंत्र सामुग्री व प्रशिक्षित तंत्रज्ञ सहायाने बनविले जात असतात. दिव्यांग व्यक्तींना हे कृत्रिम पाय बसविल्यास ती व्यक्ती चालणे,पळणे,उडी मारणे, वाहन चालविणे इत्यादी दैनंदिन सहज क्रिया करू शकतात असा विश्वास श्री विनय खटावकर यांनी व्यक्त केला. नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी जयंत जस्ते, संपर्क क्र- ९८२२५१०३४९ व अनिरुद्ध पाटणकर, संपर्क क्र- ९४४५५०४९६४

शिबिरात येणाऱ्या दिव्यांग व्यक्तींची श्री.गुरुजी रुग्णालय, छत्रपती चौक, नांदेड येथे येताना गैरसोय होऊ नये, यासाठी रेल्वे स्टेशन व बसस्थानक येथून वाहनांची सोय करण्यात आली असून अशा गरजू व्यक्तिंच्या चहा, नाष्टा व भोजनाची व्यवस्था श्री गुरुजी रुग्णालयाच्या वतीने करण्यात आली असून श्री. गुरुजी रुग्णालय हे १५० खाटांचे अद्यावत रुग्णालय असून हे सामाजिक सेवेतून चालविले जाते. यातून वेगवेगळे शिबीरे रुग्णालय व ग्रामीण भागात जाऊन घेतली जातात तसेच रुग्णांना 24 तास माफक दरात सेवा पुरविली जाते असे नंदीग्राम वैद्यकीय सहकारी संस्था संचालक डॉ- लक्ष्मिकांत बजाज यांनी प्रास्ताविकात सांगितले.

