
मुदखेड/नांदेड। अगदी बाल वयापासून ते अंतिम श्वासापर्यंत आभाळाएवढे दुःख सहन करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना समाज परिवर्तनाच्या लढाईत व सामाजिक संघर्षात साथ देणाऱ्या त्यागमुर्ती रमाई आभाळाहूनही मोठया ठरल्याचे मत व्यक्त करतांनाच त्यांच्या त्याग व प्रेरणादायी कार्य, कर्तत्वाचा वारसा जोपासण्याचे आवाहन बार्टीच्या समतादूत ऍड.राणीपद्मावती बंडेवार यांनी केले.

माता रमाई डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असलेली डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी),पूणे समतादूत प्रकल्पाच्यावतिने मुदखेड तालुक्यातील मुगटच्या अंगणवाडी क्रमांक ४ मध्ये आयोजित कार्यक्रमात त्या मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या.

याप्रसंगी पूढे बोलतांना समतादूत राणीपद्मावती बंडेवार म्हणाल्या की,माता रमाई यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपल्या संसाराचा गाडा हाकतांना औषधासाठी पैसे नसल्यानेच स्वतःची चार मुलं गमावल्याचे दुःख पचविले.मात्र, शिक्षणासाठी परदेशात असलेल्या आपल्या पतीच्या अभ्यासात कधीही खंड पडू दिला नाही.त्यांचा तो त्याग व समाज परिवर्तनात दिलेली साथ यामूळेच भिमराव रामजी आंबेडकर हे विश्वरत्न, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर होऊ शकले अन् तमाम भारतीयांचे उद्धारकर्ते बनले. त्यांनी या देशातील तमाम जनतेला अथक परिश्रमातून लिहिलेलं व जगात सर्वश्रेष्ठ असलेलं भारतीय संविधान दिले.

या भारतीय संविधानानेच देशातील प्रत्येकाला मान, सन्मान व समानतेचा हक्क दिला.समता,स्वातंत्र्य,बंधूता व सामाजिक न्याय या मूल्यांना यामध्ये सर्वोच्च स्थान आहे. आपलं भारतीय संविधान हे आपली ताकद व जगण्याचा मूलाधार आहे.आपल्या देशाची अखंडता व राष्ट्रीय एकता अबाधित ठेवणारं आपलं भारतीय संविधान प्राणप्रिय आहे.म्हणूनच,त्याच्या रक्षणासाठी या मूल्यांचा अंगीकार करण्याचा निश्चय प्रत्येकांनी करावा.सोबतच, यासाठी माता रमाई यांनी केलेला त्याग डोळ्यापुढे ठेऊन प्रत्येक महिला भगिनींनी आपल्या मुलांवर योग्य धम्मसंस्कार करून चांगली मुल घडवण्याचे आवाहनही शेवटी समतादूत बंडेवार यांनी केले.

याप्रसंगी येथिल अंगणवाडी क्र.०४ च्या अंगणवाडी कार्यकर्ती सौ.सुमन रामजी नरवाडे, मदतनीस सौ.रेखा नामदेव गवारे,वर्षा मिलिंद हटकर, प्रतिभा हटकर,सुभद्रा हटकर, रत्नमाला हटकर,सुजाता हटकर,धृपतबाई हटकर, रेखा हटकर,रेणुका हटकर,रंजना लिंगायत,जयश्री पांचाळ, आम्रपाली गवारे,मिरा आडेराव, छाया हटकर, विशाखा हटकर, तृप्ती हटकर आदींसह स्थानिक अंगणवाडीतील बालक- बालिका व त्यांच्या माता,भगिनी तसेच,येथिल मुली व महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.

