
हदगाव/तामसा, गजानन जिदेवार। महाशिवरात्रि पर्वावर या वैशिष्ट्यपूर्ण योगाचा परमार्थिक लाभ घेण्यासाठी व श्री शिवलीलामृत व परमाब्धी या ग्रंथद्वयांचे पारायण, पंचाक्षर व वैश्विक मंत्र- जय परेश सर्वायन या मंत्रद्वयांचे जपानुष्ठान तसेच इतरही अध्यात्मानुवर्ती कार्यक्रमांच्या आयोजनासह मुख्यरूपाने लक्ष दीपाराधन महोत्सवाचे आयोजन दि. 13 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी 2023 या पर्वात केले आहे.

अज्ञानरूपी अंधकाराचा नाश व्हावा म्हणून किंवा अज्ञानरूपी अंधश्रद्धा दूर करण्याची प्रेरणा देण्यासाठी परमार्थ मार्गाकडे सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी दिव्य प्रकाश युक्त अशा उर्ध्वलोकांच्या अनुसंधानासाठी किंवा सामूहिक समाधानाचे एक साधन म्हणून दीपोत्सव साजरा करण्यात आला. दीपज्योती ही मंगलतेची, पवित्रतेची, प्राणरूपतेची व ज्ञानप्रभेची प्रतिकरुपीनी आहे. तेज:प्रधान, मंगलनिधान व सात्विकता परिधानकरत्या दीपांचे सानिध्य मंदिरादी पवित्र स्थानी असावे असे धर्मशास्त्र विधानही आहे.

परमार्थ मार्ग दाखविणारा दीप हा आतला अंधार दूर करतो. ज्ञानदानाने परमार्थ मार्ग दाता दीप प्रज्वलित करून सर्वांनाच मोक्षगामी बनविण्याचा शुभ अतिशुभ महान मंगल हेतूने लक्षदीपाराधन महोत्सवाचे लक्ष निर्धारित करीत या पूर्ण पावनकार्यास पूर्णत्वास नेण्याचे कार्य परिसरस्थ ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले अशी माहिती समिधा कोंडलिंगेश्वर देवस्थानचे पुजारी महंत श्री विरागीदास महाराज यांनी दिली.

यावेळी त्यांनी “जगातील व्यवहारात शुभ प्रतिकत्वामुळे प्रकाशाविषयी आकर्षण दिसून येते तसेच अंधाराशी तीव्र संघर्ष ही दिसून येतो त्यामुळे जगात नानाविध प्रार्थना गृहामध्ये व विविध मतरूपी संप्रदाय धारकामध्ये दीपाचे महत्व आढळते. दीपज्योती ही मंगलतेची, पवित्रतेची, प्राणरूपतेची व ज्ञानप्रभेची प्रतिकृती आहे, लौकिक दीप हा बाहेर असलेला अंधार दूर करतो. प्रकाशाची उपासना सूर्य, चंद्र, तारे, नक्षत्र, अग्निदीप यांच्या रूपात सदैवच होत आली आहे. आकाश, भूमी, अग्नि, वायू, जलादी पंचमहाभूतांच्या उपस्थितीनेच दीप प्रज्वलित होतो. दीपक शब्दाची उत्पत्ती दीप दिप्त्यो धातू पासून आहे. ज्याचा अर्थ चमकणे,जळणे, तापणे, ज्योतिरमय होणे, प्रकाशित होणे असा आहे. तसेच यावर्षीची महाशिवरात्री ही शनी प्रदोषाने युक्त आहे हा अतिशय शुभ संयोग आहे.” असे सांगत दीपाराधन सोहळ्याचे महत्त्व अधोरेखित केले व पुढील सर्व धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेण्याच्या आवाहन केले.

