
हिमायतनगर। नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील मौजे गऊळ येथुन आण्णाभाऊ साठे पिपल्स फोर्स च्या वतीने जेष्ठ विचारवंत डॉ.शंकर गड्डमवार यांच्या नेतृत्वात सुरू झालेली “समाज जोडो यात्रा” १७ फेब्रुवारी २०२३ रोजी हिमायतनगर तालुक्यात प्रवेशित झाली. संपुर्ण महाराष्ट्रातील मातंग समाजाला संघटित करण्यासाठी महाराष्ट्र पिंजुन काढणारे “आण्णाभाऊ साठे पिपल्स फोर्स” चे संस्थापक अध्यक्ष श्री. बा.रा.वाघमारे व कार्यकर्त्यांचे तालुक्यातील मातंग समाजाचे जेष्ठ नेते उपसरपंच श्री.संतोष आंबेकर यांच्या हस्ते हिमायतनगर नगरीत जंगी स्वागत करण्यात आले.

विघटित असलेला समाज संघटित करण्याची ताकत फक्त बहुजन महामानवांच्या विचारात आहे. तो शिवराय, फुले, शाहु, आंबेडकर, आण्णाभाऊंचा समतावादी व परिवर्तनवादी विचार खेड्यापाड्यात ,वस्ती तांड्यात घेऊन जाण्याचे काम “समाज जोडो यात्रेच्या” माध्यमातून होत आहे त्यामुळे हिमायतनगर तालुक्याच्या वतीने या यात्रेकरुंचे मनापासुन स्वागत करतो असे मत उपसरपंच श्री. संतोष आंबेकर यांनी व्यक्त केले. तसेच मुंबई विद्यापीठाला साहित्यसम्राट आण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्याची मागणी मुख्यमंत्री महोदयांकडे लवकरच करणार असे आश्वासन त्यांनी यावेळी सभेला संबोधित करताना दिले.

तसेच समाज जोडो यात्रेचे प्रमुख श्री. बा.रा. वाघमारे हे बोलताना म्हणाले कि, तालुक्यातील मातंग समाज हा महापुरुषांच्या विचारांनी प्रभावित असुन शिक्षण घेऊन पुढे येणारा युवा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे जो समाजाचा आधारस्तंभ आहे. मातंग समाजातील जेष्ठ नेते ज्यांनी अगदी कमी वयात आपले वेगळे राजकिय वलय निर्माण केले असे उपसरपंच संतोष आंबेकर यांच्याही कामाचे त्यांनी भरभरुन कौतुक केले.

हिमायतनगर येथिल आण्णाभाऊ साठे सभागृहात क्रांतीगुरु लहुजी साळवे यांच्या स्मृतीस अभिवादन करुन ही यात्रा ग्रामिण भागात गेली. मंगरुळ, खैरगाव, विरसणी, करंजी, सरसम गावांसह अनेक गावातुन नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

