
हिमायतनगर, अनिल मादसवार। वाढोण्याचे जागृत देवस्थान श्री परमेश्वर नवसाला पावनारा म्हणुन सर्वत्र ख्यातीप्राप्त आहे. माघ कृ.13 दि.१८ शनिवारी महाशिवरात्रीच्या शुभमुहुर्तावर लाखो भावीकांनी श्रीचे दर्शन जिल्हयासह मराठवाडा-विदर्भ- आंध्रप्रदेशातील भक्तांनी घेऊन पुण्य प्राप्त केले आहे. त्यामुळे शहरात सवर्त्र भक्तांची मंदियाळी दिसुन आल्याने भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.

प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी भगवान शंकराच्या अवतारातील उभी असलेल्या श्री परमेश्वरची सगुणरूप मूर्ती याच पर्व काळात शेती नागरताना एका शेतकऱ्याला सापडली होती. तेंव्हा या ठिकाणी मंदिराची उभारणी करून महाशिवरात्रीच्या निमित्ताने भव्य यात्रौत्सव साजरा केला जातो. जवळपास पंधरा दिवस चालणाऱ्या या यात्रेत विविध धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. माघ कृ.११ दि.१६ गुरुवार पासून यात्रेला अखंड हरीनाम, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाने सुरुवात झाली आहे. ग्रंथराज पारायणाचे व्यासपीठ श्री शिवाजी जाधव महाराज यांनी सांभाळले असून, त्यांच्या मधुर वाणीत ग्रंथाचे पठण केले जात आहे. पहिल्याचा दिवशी शहरातील शेकडो महिला, पुरुष व बालभक्तानी ज्ञानेश्वरी परायणात सहभाग घेतला असल्याने शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

यात सामील झालेल्या परायणार्थी भक्तांना मंदिराच्या वतीने ज्ञानेश्वरी ग्रंथ देण्यात आला आहे. यात्रा महोत्सव काळात सप्ताहभर धार्मिक कीर्तन, पारायण, प्रवचन, तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा आणि कब्बड्डी, कुस्ती स्पर्धा आदी कार्यक्रम संपन्न होणार आहेत. दि. १८ शनिवारी आलेल्या महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर पारण्याच्या उपवास धरुन सुर्यास्ता पर्यन्त लाखो भावीक भक्तांनी दर्शन घेतले. दर्शनासाठी मध्यरात्री 3 वाजल्या पासुनच मंदिर प्रांगणात भाविकांनी गर्दी केली होती. भक्तांच्या सुवीधेसाठी मंदिर समीतीने बुलढाणा अर्बन बैंक, बजरंग दल व भाविकांच्या सहकाऱ्यातून विषेश सुवीधा, फराळ पाण्याची सोय केली होती.

दोन वर्षाच्या कोरोना काळानंतर यात्रा होत असल्याने मंदिर समितीकडून मंदिराच्या कळसासह, मुख्य कमानीवर आकर्षक विद्दुत रोषनाई करण्यात आली होती, त्यामुळे भाविकांच्या डोळ्याचे पारणे फिटणारे कारंजे, विद्दुत रोषणाई आणि मंदिराची करण्यात आलेली सजावट पाहून अनेकांनी कौतुक केले. दूर दूरवरून भाविक भक्तांनी रांगा लावून मनोभावे दर्शन घेवून डोळ्याचे पारणे फेडले. दरम्यान मंदिर दशर्नसाठी आलेले भावीक व अंलकारमय श्री मुर्तीच्या संरक्षणासाठी पोलीस अधिक्षक परमजितिसंह दहिया यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री बी.डी. भुसनूर यांनी मंदिर परीसरात पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त लावला आहे.

