
हिमायतनगर। येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मौजे सरसम येथे 11 ते 17 फेब्रुवारी या दरम्यान युवकांचा ध्यास, ग्राम शहर विकास या विशेष युवक शिबिराच्या समारोपप्रसंगी बोलताना इंग्रजीचे अभ्यासक व विचारवंत डॉ. दुर्गेश रवंदे म्हणाले की, विद्यार्थ्यांनो चारित्र्य निर्मितीसाठी व व्यक्तिमत्व विकासासाठी स्वामी विवेकानंदांनी सांगितलेल्या चार योगाना समजून घेणे महत्त्वाचे आहे.

कर्मयोगाविषयी बोलताना ते म्हणाले, आदर्श समाज व राष्ट्राचा विचार करताना मी माझे काम प्रामाणिक करतो की नाही, करत असेल तरच आदर्श समाज व राष्ट्राची निर्मिती होते, अन्यत: होत नाही. म्हणून त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा दाखला दिला. आणि विवेकानंदांनी सांगितलेल्या दुसऱ्या राजयोगाविषयी बोलताना ते म्हणाले की, प्रत्येक युवकांच्या केंद्रस्थानी क्षमा भाव असावा, तुम्ही इतरांना क्षमा करायला शिकले पाहिजे. हे भगवान बुद्धाचे सहज तत्वज्ञान त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले. हे सांगताना ते पुढे म्हणले की, आज 21 व्या शतकात मोबाईल मूळे इतरांशी सुसंवाद साधल्या जात नाही. समाज व जनमानसातील सुसंवाद साधण्यासाठी तुम्ही जगायला शिका. माणसाला सुखाच्या व दुःखाच्या कठीण प्रसंगी माणसाचीच गरज असते.

त्यासाठी तुम्हाला इतरांशी एकरूप व्हावे लागेल. आपल्यातील इगो बाजूला काढून टाकून मी कोण आहे, यापेक्षा मी काय करतो याला अधिक महत्त्व देणे गरजेचे आहे. जगात एकच भाषा व धर्मच आहे. ती म्हणजे मानसातली माणुसकी, अशा पद्धतीने त्यांनी पुढे स्वामी विवेकानंदांनी सांगितलेल्या भक्तीयोगाचं प्रतिपादन करतांना सांगितले की, भक्तियोग मानसाला इतरांवर प्रेम करायला शिकवतो. म्हणून आपण इतरांवर प्रेम केले पाहिजे. प्रेम करणे ही एक कला आहे. ती निरपेक्ष निरंतर चालत असते. प्रेम करणाऱ्या व्यक्तीला आपल्या जीवनात अतिशय महत्त्व दिले पाहिजे. विद्यार्थ्यांनो तुम्ही स्वतःला विसर्जित करायला शिका. विसर्जित होने हे विद्यार्थ्यांचे परमकर्तव्य आहे. अशा पद्धतीने त्यांनी पुढे स्वामी विवेकानंदांनी सांगितलेल्या ज्ञानयोगा विषयी सांगताना म्हणतात की, जी माहिती विद्यार्थी कृतीमध्ये उतरवितो ते ज्ञान होय. जे आपल्यात नाही ते इतरांकडून घेणे म्हणजे ज्ञान होय.

अशा रीतीने सहज भाषेतून ज्ञानाची व्याख्या करून सांगिताना म्हणाले की, मानवी जीवनाचे सगळ्यात महत्त्वाचे तत्त्व होय की, माणसाचे स्वतःसाठी जगणे म्हणजे मरणे आहे आणि इतरांसाठी जगणे म्हणजे जगणे आहे. अशा पद्धतीने त्यांनी स्वामी विवेकानंदाचे चार योगाचे तत्वज्ञान तब्बल एक तास विद्यार्थ्यांसमोर विस्ताराने सांगून वरील चार योगांचे सार म्हणजेच व्यक्तिमत्त्व आणि चारित्र्य निर्मिती होय असं समारोपीय प्रतिपादन त्यांनी केले.

राष्ट्रीय सेवा योजना विशेष युवक शिबिर समारोपाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे स्टाफ सेक्रेटरी डॉ. डी के कदम हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून के. के. एम. महाविद्यालय, मानवत येथील इंग्रजी विषयाचे विभाग प्रमुख तथा सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ. दुर्गेश रवंदे हे लाभले होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून सरसम येथील सरपंच सौ. काशीबाई ठाकूर रासेयो चे विभागीय समन्वयक डॉ. शेषराव माने, प्राचार्य डॉ. उज्वला सदावर्ते, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. शिवाजी भदरगे सहकार्यक्रमाधिकारी डॉ. एल. बी. डोंगरे, नॅक समन्वयक डॉ. गजानन दगडे आदींची उपस्थिती होती लाभली होती.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मंचावरील मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व वीर हुतात्मा जयवंतराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तदनंतर मान्यवरांचे स्वागत करून चारही ग्रुपच्या प्रमुखास सर्व ग्रुप मधील स्वंयसेवकांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. तदनंतर कार्यक्रमाधिकारी डॉ शिवाजी भदरगे यांनी कार्यक्रमाची भूमिका व आलेख वाचन केले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या चारही ग्रुपच्या एक एक विद्यार्थीनी आपले शिबिरातील अनुभव व्यक्त केले. त्यानंतर प्राचार्य डॉ उज्ज्वला सदावर्ते यांनी आपले थोडक्यात मनोगत व्यक्त केले. तसेच मंचावर उपस्थित असलेले विभागीय समन्वयक डॉ. शेषराव माने यांनी सुद्धा आपले थोडक्यात मनोगत व्यक्त केले. तदनंतर प्रमुख पाहुणे डॉ. दुर्गेश रवंदे यांनी मंचावरून आपले विस्ताराने विचार मांडले. आणि शेवटी कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप डॉ. डी. के. कदम यांनी केला.

या कार्यक्रमाचे सुंदर असे सुत्रसंचालन स्वयंसेवक निलेश चटणे यांनी केले तर आभार डॉ. एल. बी. डोंगरे यांनी मानले. या संपूर्ण शिबिराच्या कालावधीमध्ये डॉ. दिलीप माने, डॉ. शेख शहेनाज, व सविता बोंढारे यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच या समारोपीय कार्यक्रमाला महाविद्यालयाचे संपूर्ण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
