
नांदेड| राजर्षी शाहू महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित येथील सप्तरंगी साहित्य मंडळाच्या दुसऱ्या एकदिवसीय जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाच्या उद्घाटनपूर्व सत्रात उपक्रमशील शिक्षक संतोष तळेगावे यांच्या संकल्पनेतील आणि संकलनातील दुर्मिळ निजामकालीन जुनाट नाणी आणि नोटांचे निरिक्षणात्मक अभ्यासाची संधी बच्चे कंपनी विशेषतः महिलांनी साधली. एकूण वीस देश विदेशातील नाणी आणि नोटांची नाणी संकलित रित्या पाहता आलीत. निमित्त होते जवळा देशमुख येथील साहित्य संमेलनाचे!

यावेळी संमेलनाध्यक्ष डॉ. राम वाघमारे, अॅड. विष्णू गोडबोले, स्वागताध्यक्ष राहुल देशमुख, कार्यक्रम समितीचे अध्यक्ष अंबादास देशमुख, संयोजन समितीचे अध्यक्ष गोविंदराव देशमुख, इसाप प्रकाशनचे दत्ता डांगे, सरपंच कमलताई शिखरे, साहेबराव शिखरे, माजी सरपंच कैलास गोडबोले, संतोष पांडागळे, मिलिंद व्यवहारे, डॉ. विलास ढवळे, स्वाती कान्हेगांवकर, दिलीप गवळी, बाबुराव पाईकराव, सुधाकर पंडित, भालचंद्र जोंधळे, मनोहर गायकवाड, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, पांडूरंग कोकुलवार, कैलास धुतराज, शंकर गच्चे, रणजित गोणारकर, प्रकाश ढवळे नागलगांवकर, रुपाली वागरे वैद्य, साईनाथ रहाटकर, गौतम कांबळे, मुख्य संयोजक भैय्यासाहेब गोडबोले आदींची उपस्थिती होती.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत हे नाणी प्रदर्शन भरविण्यात आले होते. यात संकलितरित्या निझामकालीन, ईस्ट इंडिया कंपनीचे इ.स १८३६, एलीझाबेत राणीचे व्हिक्टोरिया राणीचे तसेच माधवराव शिंदे सरकारच्या काळातील एक, दोन, पाच ,दहा, वीस, पन्नास, शंभरच्या जुन्या नोटा आणि एकूण २५० नाण्यांचा अंतर्भाव होता. संतोष तळेगावे हे मुखेड येथील रहिवासी असून येवतीच्या शिवाजी माध्यमिक विद्यालयात शिक्षक आहेत. आत्तापर्यंत त्यांनी सिंधी, वाघलवाडा, नरसी येथे भरलेल्या लोकसंवाद साहित्य संमेलनात आणि विविध शाळांमध्ये हे प्रदर्शन भरविले होते. दुसऱ्या जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाच्या परिसंवाद सत्रात तळेगावे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

