
नांदेड| छत्रपती शिवाजी महाराज हे जाणते राजे होते, द्रष्टे प्रशासक आणि कुशल संघटकही होते. जात-पात, धर्म यांचा भेदाभेदा न करता समाजातील सार्या घटकांची मूठ बांधून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. जिजाऊ माता आणि शहाजी राजेंकडून त्यांच्यावर संस्कार झाले. परकीय आक्रमणांना परतून लावत त्यांनी स्वराज्याची स्थापन केले. शिवरायाचं व्यक्तिमत्त्व आजही सार्यांसाठीच प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन येथील महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर यांनी केले.

ते जवळा दे. येथे शिवजयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक ढवळे जी. एस., सहशिक्षक संतोष घटकार, किशन गोडबोले, चांदू गोडबोले, मारोती चक्रधर, हैदर शेख, कमलबाई गच्चे, मनिषा गच्चे यांची उपस्थिती होती.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९३ व्या जयंतीनिमित्त प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शिवचरित्रावर आधारित शिवज्ञान चाचणी परीक्षा घेण्यात आली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरेखनाची रंगभरण स्पर्धा घेण्यात आली. त्यानंतर महाराजांच्या जीवनावर आधारित दोन गटांत भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता.

यावेळी मुख्याध्यापक ढवळे जी. एस. यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, शिवाजी महाराज खरे वीर राष्ट्रपुरुष होते. त्यांचा हा महाभूषणप्रद गुण होय. प्रखर जिद्द , कुशल संघटन, शौर्य, विरता, साहस, बुद्धिचातुर्य, चारित्र्य या नैतिक गुणांमुळेच महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले. आजच्या विद्यार्थ्यांनी हे गुण अंगिकारायला हवेत असे ते म्हणाले.

