
नांदेड| येथील आंतरराष्ट्रीय ख्यातकीर्त बाल लावणी कलावंत डॉ. विद्याश्री येमचे यांच्या लावणी कला प्रदर्शनाने साहित्य संमेलनात रंगत आणली. एवढेच नव्हे तर १४ वर्षांच्या या मुलीने उपस्थित महिला पुरुष तसेच बालक बालिका प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवले.

या लावणी कलाप्रदर्शनाचा आस्वाद संमेलनाध्यक्ष डॉ. राम वाघमारे, अॅड. विष्णू गोडबोले, संतोष पांडागळे, मिलिंद व्यवहारे, डॉ. विलास ढवळे, स्वाती कान्हेगांवकर, बाबुराव पाईकराव, सुधाकर पंडित, भालचंद्र जोंधळे, मनोहर गायकवाड, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, पांडूरंग कोकुलवार, कैलास धुतराज, शंकर गच्चे, जिल्हाध्यक्ष रणजित गोणारकर, प्रकाश ढवळे नागलगांवकर, रुपाली वागरे वैद्य, साईनाथ रहाटकर, गौतम कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी घेतला.

राजर्षी शाहू महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या वतीने जवळा देशमुख येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत सप्तरंगी साहित्य मंडळाच्या दुसऱ्या एकदिवसीय जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाचा प्रारंभ ग्रंथदिंडीने झाला. त्यानंतर संतोष तळेगावे यांच्या नाणी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर परिसंवाद, कथाकथन, कविसंमेलन, ठराववाचन आदी कार्यक्रम संपन्न झाले.

तसेच प्रतिष्ठानच्या वतीने जनसंवाद पुरस्कार -२०२३ चे मान्यवरांच्या हस्ते अत्यंत सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. दरम्यान डॉ. विद्याश्री येमचे या बालकलाकाराने ‘चंद्रा’, ‘बाई मी लाडाची गं लाडाची कैरी पाडाची’, ‘आई मला नेसव शालू नवा’, ‘कुठं कुठं जायचं हनिमूनला ‘ आदी लावणी नृत्य सादर करुन उपस्थितांची वाहवा मिळवली. यावेळी विद्याश्री येमचे यांचा आईवडिलांसह सत्कार करण्यात आला.

