नांदेड| विश्व रविदासिया धर्म संघटना बेगमपुर मार्ग या धार्मिक संघटनेची आम्ही स्थापना केली असून, यात सहभागी होऊन गुरु रविदासांचा परिवर्तनवादी विचार जगात पोहोचविण्याचे काम करु या ! असे प्रतिपादन विश्व रविदासिया धर्म संघटनेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष विक्रम सिंह रविदासिया (पंजाब) यांनी केले.
गुरु रविदास मंदिर सिडको नांदेड येथे १५ फेब्रुवारी रोजी आयोजित वीर कक्कय्या आणि गुरु रविदास संयुक्त जयंती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून विक्रम सिंह हे बोलत होते. अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. स्वागताध्यक्ष व्यंकटराव दुधंबे यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले.
मा. विक्रम सिंह आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, चर्मकार ही जात नसून व्यवसाय आहे. आम्हाला गुरु रविदासांच्या मानवतावादाच्या आधारे सर्व जाती धर्मांच्या लोकांना जोडून दुःख विरहित बेगमपुरा ही गुरु रविदासांची संकल्पना साकार करायची आहे. यासाठी गुरु रविदास वाणीची शिकवण देणाऱ्या शाळा आम्ही स्थापन करीत आहोत. त्यातून भावी पिढी घडू शकते.
अध्यक्षीय समारोप करताना इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी गुरु रविदास यांच्या नावाने संत, साधू, महाराज बनून फिरणाऱ्या ढोंगी पाखंडी लोकांचा खरपूस समाचार घेतला. समाजातील शिकल्या सावरलेल्या लोकांनी आपल्या सामाजिक जबाबदारीचे पालन करावे. १५ फेब्रुवारी रोजी दरवर्षी वार कोणताही असला तरी, आवश्यकता भासल्यास सुट्टी घेऊन कर्मचाऱ्यांनी जयंती व अन्य सामाजिक कार्यक्रमांना आपली हजेरी लावणे गरजेचे आहे.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून अदिलाबाद (तेलंगणा) येथील सुप्रसिद्ध साहित्यिक मधु बावलकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. आपल्या महामानवांची विचारधारा एक होती पण आपण वेगवेगळ्या मार्गांनी काम करीत आहोत, त्यामुळे महामानवांचे मिशन पूर्ण होत नाही. यासाठी अगोदर आपले ध्येय आणि उद्दिष्ट निश्चित करुन सर्वांनी एक विचारांनी मिशनरी भावनेने काम करावे असे आवाहन बावलकर यांनी केले.
अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष शिवाजीराव लकवाले (उदगीर) यांनी मान्यवर कांशीराम ही आमची प्रेरणा असल्याचे नमूद करुन त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविलेल्या गुरु रविदास संदेश यात्रेचा इतिहास कथन केला. परिवर्तनवादी रविदास आम्ही घराघरात पोहोचविला. जे नेते रोहिदास म्हणत होते त्यांना रविदास म्हणायला आम्ही भाग पाडले. तीच चळवळ आता पुन्हा एकदा राबविण्याची वेळ आली आहे.
याप्रसंगी रामकुमार असनावडे रविदासिया (मेरठ, उत्तर प्रदेश), राष्ट्रीय ढोर समाज संघटनेचे प्रदेश महासचिव नामदेव फुलपगार, विश्व रविदास पिठाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव धाडवे (वाशिम), माजी उपमहापौर विनय गिरडे पाटील, चि. वेदांत उकंडे आदींनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भारत सोनटक्के यांनी केले तर शेवटी विठ्ठल वाघमारे यांनी आभार मानले. स्नेहभोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
यावेळी किशनराव गवळी, पिराजी सोनटक्के, गंगाधर गंगासागरे, विठ्ठल उकंडे, नारायण वाघमारे, नामदेव पद्मने, शंकर धडके, लिंबाजी अन्नपूर्णे, बाबुराव नरहिरे, ब्रह्माजी गायकवाड, गणेश अडेराव, शंकर शेळके, अतुल वाघमारे, शिवानंद जोगदंड, नागनाथ गिरगावकर, ज्ञानोबा गायकवाड, गोपीचंद गुरव, अंकुश जोगदंड, व्यंकटराव सोनटक्के, विठ्ठल अन्नपूर्णे, दत्तात्रय भालके, तुकाराम चंदनकर, शिवराज कांबळे, परशुराम उतकर, अनिता देगलूरकर, इंदुताई भालके, रुक्मिनबाई गवळी, सुमन टोम्पे आदींची प्रमुख उपस्थिती होती.