
नांदेड| मातंग समाजाच्यावतीने दि. २२ फेब्रुवारी २०२३ रोजी आझाद मैदान मुंबई येथे विविध मागण्यांसाठी जबाब दो आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनास नांदेड जिल्ह्यातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय मातंग संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष भारत खडसे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

सन २०१२ पासून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व चेअरमन यांच्या भ्रष्ट कारभारामुळे चौकशीच्या नावाखाली संचालक मंडळ बरखास्त केले. त्यानंतर त्यांची नियुक्ती करण्यात आली नसल्यामुळे समाजातील व इतर ८ पोटजातीतील सुशिक्षीत बेरोजगार युवकांचे अतोनात नुकसान होत आहे. समाजाच्या विकासासाठी असलेले एकमेव महामंडळ बंद पडल्यामुळे लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. मातंग समाजाला स्वतंत्र ८ टक्के राजकीय, शैक्षणिक, नौकरी व इतर विभागात आरक्षण देण्यात यावे, अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या योजना २०१२ पासून बंद करुन मातंग समाजावर अन्याय केला आहे.

तसेच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) ची स्थापना करण्यात यावी, अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे अ, ब, क, ड असे वर्गीकरण करण्यात यावे, लहुजी साळवे आयोगाच्या ८४ शिफारशी लागू करण्यात याव्यात तसेच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळास ५ हजार कोटी रुपयाचे भाग भांडवल देण्यात यावे, एन.एस.एफ.डी.सी. दिल्ली महामंडळास ५०० कोटीची महाराष्ट्र शासनाकडून फंड हमी घेऊन त्वरीत गरजू लाभार्थ्यांना कर्ज वाटप करावे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील कर्मचार्यांना मागील अनेक वर्षापासून निलंबीत ठेवले आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. सर्व मागासवर्गीय महामंडळाच्या लाभार्थ्यांचे कर्ज माफ करावे, मातंग समाजातील नागरिक कसत असलेल्या गायरान जमीनींचे पट्टे त्यांचे नावे तात्काळ करण्यात यावे. आदी मागण्यांकरीता राष्ट्रीय मातंग संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष भारत खडसे यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना नांदेड जिल्हाधिकार्यांमार्फत व विद्यमान उपमुख्यमंत्री यांनाही निवेदन दिले आहे.

त्याच पार्श्वभूमीवर दि. २२ फेब्रुवारी २०२३ रोजी समाज बांधवांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात येणार आहे. मुंबईला जाण्याकरीता दि. २१ फेब्रुवारी रोजी नांदेड येथून नंदिग्राम एक्सप्रेस, देवगिरी एक्सप्रेस व राज्यराणी एक्सप्रेस या तीन रेल्वे गाड्यांतून समाजाच्या कार्यकर्त्यांना प्रवास करु द्यावा अशी शिफारस खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी केली आहे. विद्यमान मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी मातंग समाजाच्या जिव्हाळ्याच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांचे लक्ष वेधण्यासाठी व आपल्या मागण्या मान्य करुन घेण्यासाठी जिल्ह्यातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रीय मातंग संघाच्यावतीने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात केले आहे.

