
नांदेड| भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे दिवंगत नेते कॉ.गोविंद पानसरे यांच्या मारेकर्यांना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी व इतर विविध मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने आज (सोमवार) जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य कौन्सीलने दिवंगत कॉ.गोविंद पानसरे यांच्या स्मृतीदिनी कामगार, कष्टकरी, शेतकर्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यव्यापी एल्गार आंदोलनाची हाक दिली आहे. यानिमित्त भारतीय कम्युनिस्ट पक्ष नांदेड जिल्हा शाखेच्यावतीने कॉ.गोविंद पानसरे यांच्या मारेकर्यांना फाशीची शिक्षा द्यावी, नांदेडमधील विडी कामगारांसाठी सोलापूर प्रमाणे घरकुल योजना राबवावी, विडी व सफाई कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीतील नोदींची ऑफलाईन दुरुस्तीसाठी नांदेड येथे कॅम्प घ्यावा, त्याचप्रमाणे बांधकामासाठी मोफत वाळू पुरवठा करावा.

निराधारांना 6 हजार रुपये मानधन द्यावे, इस्लापूर नरसरीत काम करणार्या मनरेगा मजुरांचे थकीत वेतन तत्काळ द्यावे, नायगाव तालुक्यातील बळेगाव ग्रा.पं. तील भ्रष्टाचाराची चौकशी करुन ग्रामसेवक मद्देवाड यांची उच्चस्तरीय चौकशी करावी, ग्रामरोजगार सेवकांना पुर्णवेळ करुन किमान वेतनाप्रमाणे वेतन अदा करावे, ग्रामरोजगार सेवकांना 8 मार्च 2021 च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी या व इतर मागण्यांसाठी आज कलामंदिर येथुन एल्गार मोर्चा काढण्यात आला.

या मोर्चाला सीपीएमएलचे कॉ. डी.एन. घायाळे व सामाजिक कार्यकर्ते कॉ.दत्ता तुमवाड यांनी पाठिंबा दर्शविला होता. या मोर्चात भाकपचे कामगार नेते ऍड.कॉ.प्रदीप नागापूरकर, जिल्हासचिव कॉ. शिवाजी फुलवळे, कॉ. अब्दुल गफार, कॉ.देवराव नारे, कॉ.प्रकाश बैलकवाड, कॉ.सय्यद मलंग, कॉ.मोईज, कॉ.हसनाळीकर, कॉ.हुसेन शेख, कॉ.बालाजी मुगावे, कॉ.शांताबाई पवळे, कॉ. वर्षाराणी जाधव, कॉ. गणेश संदुपटला, कॉ.श्रीराम यादगीरी, कॉ.गुरुपुट्टा, कॉ. वैशाली धुळे, कॉ.कलावती कोंडापाक, कॉ.संजय जाधव, कॉ. बळी तिडके, कॉ. रावसाहेब बेलकर, कॉ.यादव हनवते यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.

