
नांदेड। जयंतीच्या माध्यमातून विचारांची देवाण-घेवाण होऊन, त्यावर मंथन केल्यास योग्य परिवर्तन आणि मार्गक्रमण होण्यास या जयंती सारखे उत्सव उपयोगी ठरतात. असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार, प्रमुख समन्वयक तथा सीमा भागाचे अभ्यासक श्री गोविंद मुंडकर यांनी केले. ते नांदेड येथील शिवपार्वती मंगल कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज आणि संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची संयुक्त जयंती आयोजित कार्यक्रमात *पत्रकारिता काल आणि आज* या विषयावर बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. नातू खंदारे हे होते. यावेळी प्रा. डॉ. अनंत राऊत आणि प्रा. डॉ. पुष्पा गंगासागरे यांनीही आपापल्या विषयावर अत्यंत प्रभावी विवेचन केले.

पूर्वी वृत्तपत्र ही विचारपत्रे होती आणि हल्लीची वृत्तपत्रे विचारापेक्षा माहिती पत्रे अधिक बनले आहेत. पूर्वीची पत्रकारिता ही समाज मन घडविण्यासाठी होती. त्यानुसार वृत्तपत्रे ही त्या दिशेने कार्यरत असल्याचे दिसून येतात. हल्लीची वृत्तपत्रात समाज मन घडविण्यासाठी नव्हे तर घडलेल्या आणि बिघडलेल्या समाजमनाचे प्रतिबिंब दिसून येते. स्वातंत्र प्राप्ती नंतरच्या कालावधीत ठराविक व्यक्तींच्या हाती वृत्तपत्रे होती. हल्ली प्रत्येकाच्या हातात (व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम) माध्यमे आलेली आहेत.

याचा कुशलते बरोबरच वास्तवता जपून वापरल्यास माध्यमासारखी प्रभावी बाब लोकशाहीला पूरक ठरू शकेल. प्रभावी यंत्रणा ही दुधारी शस्त्रासारखी आहे ज्याचा जसा वापर करू तसे त्याचे परिणाम दिसून येतील. माध्यमांचाही जसा वापर होईल तसे परिणाम दिसून येतील. माध्यमे ही ठराविक लोकांच्या हाती नाहीत तर आता समाजाच्या हाती आली आहेत. समाजाने याचा सुयोग्य उपयोग करण्याची नितांत गरज आहे. सुयोग्य उपयोगासाठी अशा जयंतीच्या माध्यमातून मंथन होणे गरजेचे आहे. यावेळी डॉ. अनंत राऊत यांनी जातीप्रथेवर कडाडून टीका केली. डॉ. पुष्पा गंगासागर यांनी संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या महिला विषयक विचारावर प्रकाश टाकला. सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यापासून भव्य मिरवणूक आणि पदयात्रा काढण्यात आली.

बाबुराव वाघमारे यांच्या सुरेल स्वरात प्रबोधनपर पोवाडा सादर करण्यात आला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री तुकाराम टोम्पे यांनी केले. नेटके सूत्रसंचालन सदाशिव आडेराव आणि सौ मीनाक्षी वाघमारे यांनी केले. आभार प्राध्यापक राजाभाऊ बनसोडे यांनी व्यक्त केले. यावेळी निवृत्त कृषी संचालक आर जी वाखरकर,प्राध्यापक खंदारे, प्राध्यापक कांबळे, पी. के. देशपांडे यासह शहरातील गणमान्य मंडळी तसेच कार्यकारी मंडळातील पदाधिकारी शिवपार्वती मंगल कार्यालयात मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणमान्य यासह महिलांची संख्या उल्लेखनीय होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चर्मकार समाजातील कार्यकर्त्यांनी विशेष पुढाकार घेतला होता.

