
पुणे| महाशिवरात्रीचे औचित्य साधून‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘ शिवार्पणम ‘ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातील नृत्य सादरीकरणांना चांगला प्रतिसाद मिळाला.नृत्यगुरू अनुजा बाठे यांची संकल्पना असलेला हा कार्यक्रम शिवांजली डान्स अॅकॅडमीने सादर केला.शनिवार , १८ फेब्रवारी २०२३ रोजी सायंकाळी ५.३० वाजता ‘भारतीय विद्या भवन’चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम झाला.

उडुपी येथील साई अन्नपूर्णी सुधाकर यांनी भरतनाट्यम सादर केले. उडुपी,मुंबई,ठाणे येथील कलाकार सहभागी झाले. अनुश्री कृष्णन,तन्वी बापट,अथर्व कुलकर्णी यांनी भरतनाट्यम सादर केले.सृष्टी हिरवे,युक्ता जोशी,नम्रता पाटील,केया शाह यांनी कथक सादर केले. आर्यही देशमुख,शुभवी जोशी,पुष्कला शास्त्री या अनुजा बाठे यांच्या शिष्यानी भरतनाट्यमच्या विशेष रचना सादर केल्या. नृत्य प्रशिक्षण क्षेत्रातील मान्यवर गुरु या कार्यक्रमाला उपस्थित होते.‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी स्वागत केले.‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १५० वा कार्यक्रम होता . हा कार्यक्रम विनामूल्य होता.

नृत्यपुष्पांजली , शिवपंचाक्षर स्तोत्र, शिव कौतुकम्
आद्य नृत्यप्रेरणा मानल्या गेलेल्या नटराज रुपी शिवशंकराला नमन करून सुरुवातीला नृत्य पुष्पांजली सादर करण्यात आली. या पुष्पांजलीला विशेष दाद मिळाली.सृष्टी हिरवे यांनी ‘ महादेव शिव शंभो ‘ ही रचना सादर केली.अनुश्री कृष्णन यांनी ‘शिवपंचाक्षर स्तोत्र ‘ सादर केले. आणि वाहवा मिळवली.युक्ता जोशी यांनी शिवतांडव स्तोत्र अत्यंत प्रभावीपणे सादर केले.उडुपीवरून आलेल्या साई अन्नपूर्णी सुधाकर हिने जालंधर कथा सादर केली.नम्रता पाटील, केया शाह ( मुंबई ) यांनी शिव ध्रुपद सादर केले. या कार्यक्रमातील अर्धनारीश्वर स्तोत्र सादरीकरणालाही चांगला प्रतिसाद मिळाला. तन्वी बापट यांनी शिव पदम आणि अथर्व कुलकर्णी या युवा भरतनाटयम कलाकाराने पारंपारिक शिव कोटुकम् प्रभावीपणे सादर केले.

