
नांदेड। महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका कर्मचारी संघटना फेडरेशनचा पिंपरी चिंचवड येथील राज्यस्तरीय मेळाव्यात कामगार कल्याणाचे विविध ठराव घेण्यात आले. कामगारांच्या प्रलंबित मागण्या शासनाने मान्य कराव्यात,अन्यथा १४ मार्चपासून संप करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. तर याचवेळी राज्यस्तरीय फेडरेशनच्या मुख्य सरचिटणीसपदी नांदेड मनपा कामगार, कर्मचारी युनियन अध्यक्ष कॉ. गणेश शिंगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

नगरविकास विभागाच्या अखत्यारीत असलेल्या नगरपालिका, नगरपंचायती व महानगरपालिकांच्या कर्मचाºयांची राज्यव्यापी संघटना व्हावी, यासाठी कॉ. गणेश शिंगे यांनी चार महिन्यांपूर्वी नांदेडच्या नियोजन भवनात राज्यातील सर्व कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाºयांची बैठक घडवून आणली. यात फेडरेशन स्थापनासाठी सुकाणू समितीची पायाभरणी केली. त्यानंतर लगेच या समितीने हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढून आपल्या मागण्यांकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधले. दि. १५ रोजी पिंपरी चिंचवड येथ फेडरेशनचा मेळावा झाला. उद्घाटन भाजप आ.उमा खापरे यांच्याहस्ते झाले.

याप्रसंगी खा.श्रीरंग बारणे, आ.महेश लांडगे, केशव घोळवे, डॉ.डी.एल.कराड हे उपस्थित होते. जुनी पेंशन योजना लागू करावे, ठेकेदारी पद्धत बंद करून कायम पदे निर्माण करावीत, ठेकेदार – कामगारांना समान काम -समान वेतन द्यावे, लाड -पागे समितीच्या शिफारशी लागू कराव्यात, सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम द्यावी, आश्वासित प्रगती योजना लागू करावी, सफाई कर्मचाºयांना मोफत घरे द्यावीत, अशी मागणी या मेळाव्यात करण्यात आली. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली जाणार असून, मागण्या मान्य झाल्या नाहीत तर येत्या १४ मार्चपासून संपावर जाण्याचा इशारा फेडरेशनने दिला आहे.

दरम्यान या मेळाव्यातच फेडरेशनची राज्यस्तरीय कार्यकारिणी निवडण्यात आली. यात अध्यक्षपदी बबन झिंजुर्डे (पिंपरी चिंचवड), मुख्य सरचिटणीस गणेश शिंगे (नांदेड) यांची तर कार्याध्यक्ष अशोक जाधव (मुंबई), प्रवक्ता गौतम खरात (औरंगाबाद), खजिनदार मनोज माछरे (पिंपरी चिंचवड), सरचिटणीस शबीर विद्रोही (नागपूर), सुरेश ठाकूर (नवी मुंबई), अशोक जानराव (सोलापूर), प्रकाश जाधव, उदय भट (पुणे), डी.एल. कराड (नाशिक), त्रिशीला कांबळे (मुंबई), विठ्ठल देवकाते (अकोला), संतोष पवार (कोकण), अशोक हिवराळे (औरंगाबाद), उपाध्यक्ष वामन कविस्कर (मुंबई), सुरेंद्र टिंगणे (नागपूर), गोविंद परब (मीरा भार्इंदर), रवी राव (ठाणे), सतीश चिंडालिया, अनिल जाधव (पनवेल), प्रल्हाद कोतवाल (अमरावती), राजेंद्र मोरे (नाशिक), अभिजित कुलकर्णी (परभणी), अंकुश गायकवाड (लातूर),दिलीप शिंदे (सांगली), विकास लगारे (कोल्हापूर),रमेश जगताप (मालेगाव) यांची निवड करण्यात आली.

