
भारतीय जनता पार्टी आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद आता विकोपाला गेला आहे. खासदार संजय राऊत यांची सध्याची वक्तव्ये पाहता हा वाद लवकर शमण्याची शक्यताही नाही. भाजप-शिवसेनेची लढाई ही वरकरणी सत्तेसाठीची लढाई दिसत असली तरी यात मानापनाच्या नाट्याचाही मोठा सहभाग आहे. त्यामुळेच आरोप-प्रत्योरोप होताना थोबाड फोडण्यापर्यत भाषेचा स्तर घसरला आहे.

शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंचीच आहे याबद्दल महाराष्ट्रात कोणाच्याही मनात संशय नाही. बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेना प्रारंभी मराठी माणसाच्या हितासाठी होती. परंतु नंतर राममंदिराचा मुद्दा जसा देशात पेटला तशी शिवसेनेने हिंदुत्वाची शाल पांघरली. देशपातळीवर राम मंदिरासाठी आंदोलन करणाऱ्या भाजपला महाराष्ट्रात मात्र फारसा जनाधार नव्हता. संघ मुख्यालय नागपुरात असूनही त्याकाळी जनसंघ किंवा भाजपला महाराष्ट्रात मोठा जनाधार मिळाला नाही.

हे शल्य मनात असणाऱ्या त्या वेळच्या भाजप नेत्यांनी हिंदुत्वाच्या मुद्यावर राज्यात शिवसेनेशी संधान साधून शिवसेना-भाजपशी युती केली. बाळासाहेब ठाकरे केवळ शिवसेनेचे सर्वेसर्वा नाही तर वयाने आणि कत्ृत्वानेही मोठेच होते. त्यामुळेच देशपातळीवर नावलोकिक मिळविणारे भाजपाचे नेते प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंढे, लालकृष्ण अडवाणी, अटलबिहारी वाजपेयी यासारखे नेते बाळासाहेबांना भेटायला मातोश्रीवर जायचे. कारण त्यावेळी भाजप दुबळी होती. त्यामुळेच त्यांनी शिवसेनेला मोठ्या भावाच्या भूमिकेत ठेऊन स्वत:कडे दुय्यम स्थान घेतले. राज्यात युतीचे शासन आल्यानंतरही मुख्यमंत्रीपद शिवसेनेला म्हणजे मनोहर जोशी यांच्याकडे आले. त्यावेळी बोलबाला शिवसेनेचाच होता. हे सर्व प्रसंग त्यावेळी तरुण असलेले उद्धव ठाकरे हे न्याहाळत असत.

राज्यात आज जो भाजपाचा बोलबाला झाला तो शिवसेनेच्या आधारामुळेच झाला हे कोणालाही मान्य करावेच लागेल. तसाच समज उद्धव ठाकरे यांचा असेल तर त्यात काही वावगे नाही. युती शासनाच्या माध्यमातून भाजपने राज्यात आपली पाळेमुळे रुजविण्यास सुरुवात केली. त्यावेळचे उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंढे यांनी भाजपाला बहुजन समाजात रुजविण्याचे काम केले. जोपर्यत भाजप दुबळी होती तोपर्यत भाजपाने वेळ प्रसंगी होणारी टीकाही सहन केली. बाळासाहेब ठाकरे अनेकदा भाजपाची कमळाबाई म्हणून हेटाळणी करीत, भाजपाने ती टीका गांभीर्याने घेतली नाही. याचे कारण शिवसेनेशी युती तुटली तर राज्यात नुकसान होऊ शकते याची जाणीव भाजप नेत्यांना होती.

राज्यात भाजपाची जशी जशी ताकद वाढत केली तशी शिवसेना कमकुवत होत गेली. राज्यात आपल्याला वातावरण अनुकूल होत असल्याचे लक्षात येताच भाजपाने शत प्रतिशत भाजपा, चप्पा चप्पा भाजपा असे नारे दिले. त्यावेळी थोड्या कुरबुरी झाल्या परंतु दोघांनीही तुटेपर्यत ताणले नाही. परंतु २०१४ नंतर देशातील राजकारणाचे चित्र पालटून गेले. इंदिरा गांधीच्या नावावर जसे उमेदवार निवडून येत तसे नरेंद्र मोदीच्या नावावरही निवडणूक जिंकता येते हे भाजपला कळाले. देशपातळीवर नरेंद्र मोदीचे नेतृत्व प्रस्थापित झाल्यानंतर आणि एकामागून एक निवडणुका जिंकल्यानंतर समिकरणे बदलली.

देशपातळीवर भाजपची वाढ होत असताना राज्यात मात्र शिवसेनेची पिछेहाट सुरु झाली. पूर्वी मोठ्या भावाच्या भूमिकेत असणारी शिवसेना आता दुय्यम भूमिकेत आली. परंतु याची जाणीव शिवसेना नेत्यांना झाली नाही. त्यांचा बाणा आणि तोरा तसाच कायम राहिला जो पूर्वी होता. येथून मानापमान नाट्याने गंभीर वळण घेण्यास सुरुवात केली. देशपातळीवर भाजपला मोदीच्या नेतृत्वात मोठे यश मिळत असताना राज्यात शिवसेना युतीच्या वाटाघाटीसाठी अडवणूक करीत होती. गृहमंत्री अमित शहा यांनी मातोश्रीवर यावे असा हट्ट धरुन बसली. अमित शहा कितीही वादग्रस्त असतील, त्यांच्यावर कितीही आरोप असतील तरी आजमितीला ते या देशाचे गृहमंत्री आहेत हे वास्तव स्वीकारले पाहिजेत. माझ्या वडिलांना भेटायला ज्याप्रमाणे अडवाणी, अटलजी येतात त्याप्रमाणे मोदी-शहा आले पाहिजेत असा दुराग्रह बाळगणे हाच मोटा बालिशपणा आहे.

बाळासाहेब ठाकरेंचे कर्तृत्व मोठे होते, वयाने ज्येष्ठ होते आणि सत्ता आल्यानंतरही त्यांनी कोणत्याही संवैधानिक पदाच्या मोहात न पडता स्वत:ला केवळ शिवसेनेचा प्रमुख एवढेच मानले. त्यांच्या या त्यागाचा सर्वानाच आदर होता. त्या आदरापोटीच सर्वजण त्यांना सन्मानाची वागणूक देत होते. कदाचित या वास्तवाचा उदध्व ठाकरे यांना विसर पडला असावा. त्यामुळेच त्यांनी युतीच्या वाटाघाटीत अडथळे आणून गृहमंत्री अमित शहा यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध मातोश्रीवर येण्यास भाग पाडले. या भेटीनंतर युती झाली परंतु निकालानंतर सत्तेची समिकरणे बदलली. अमित शहा यांच्याच भेटीत मुख्यमंत्री पदाचे ठरले होते अशी भूमिका घेऊन उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरठाव मांडला. अमित शहांना मातोश्रीवर त्यांच्या इच्छेविरुद्ध बोलावून पुन्हा त्यांच्याच बैठकीत जे ठरले नाही ते सांगून उद्धव ठाकरे यांनी भाजपला विशेषत: अमित शहा यांना दुहेरी दुखावले. त्याचवेळी शिवसेनेची गलबते पाण्यात बुडण्याला सुरुवात झाली. सत्तेच्या तोऱ्यात आणि अनावश्यक ठिकाणी ठाकरी बाणा दाखविण्याच्या नादात आपल्या बुडाखाली काय पेरुन ठेवले याची जाणीव उद्वव ठाकरे यांना झाली नसावी. संधी मिळताच भाजपाने शिवसेनेची उधारी व्याजासकट परत केली.
महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले त्या दिवसापासून एकनाथ शिंदे नाराज होते. आता खुद्द अजित दादांनीही सांगितले की, पवारसाहेब आणि मी उद्धव ठाकरे यांना याची जाणीव करुन दिली. त्यानंतर ठाकरे गाफील राहिले. अमित शहाच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदाचे ठरले हा साक्षात्कार त्यांना निकालानंतर झाला. त्यापूर्वी एकदाही त्यांनी याचे सुतोवाच केले नाही. खुद्द अमित शहा म्हणाले असे काही ठरले नाही. फडणवीस म्हणाले. राज ठाकरेही म्हणाले. मग एकटे तुम्हीच म्हणता त्यावर राज्यातील जनतेने विश्वास कसा ठेवायचा? असे होत नसते. उद्धव ठाकरे यांची सर्वात मोठी चूक त्यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यात झाली. अनेकदा किंग पेक्षा किंगमेकर मोठा असतो. स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधी पंतप्रधान झाले नाही म्हणूनच ते राष्ट्रपिता झाले. इंदिरा गांधीची सत्ता पालटूनही जयप्रकाश नारायण पंतप्रधान झाले नाही म्हणूनच ते मोठे झाले. युती शासनाची सत्ता येऊनही बाळासाहेब मुख्यमंत्री झाले नाही त्यामुळेच त्यांच्या प्रतिचा आदर शत प्रतिशत वाढला.
उद्धव ठाकरे यांनी तेव्हाच आप्लया ऐवजी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले आणि उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबाप्रमाणेच सत्तेचा रिमोट आपल्या हातात ठेवला असता तर आज ही वेळ आली नसती. दुसरी मोठी चूक त्यांनी केली आपल्या मंत्रिमंडळात आपल्याच मुलाला कँबिनेट दर्जाचे मंत्री केले. स्वत: मुख्यमंत्री असताना मुलाला कँबिनेट मंत्री करण्या ऐवजी शिवसेनेतील एखाद्याला मंत्री केले असते तर वेगळा संदेश गेला असता. या त्यांच्या चुका इतरापेक्षा शिवसैनिकांनाच अधिक खदखदत राहिल्या. त्यातून वेळ येताच एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना घेऊन असा तख्ता पलटविला की आज सत्ता तर गेलीच, पक्षही हातातून गेला. आज संजय राऊत काहीही आरोप करु द्या, सत्य हेच आहे की, निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेना दिले.
आता आरोप प्रत्यारोप करुन काहीही फायदा होणार नाही. षंढ, नामर्द, गद्दार, ५० खोके अशी वाक्ये टीव्हीवर बोलला तर तुम्हाला समाधान मिळेल. सत्ता आणि पक्ष मिळणार नाही. झाल्या चुका सुधारुन कायदेशीर मार्गाने हा पेच सोडविण्यातच शहाणपणा आहे. आदळआपट करुन, शिव्यांची लाखोली वाहून शिवाजी पार्कात टाळ्या मिळतील, कोर्टात न्याय मिळणार नाही. शिवसेनेला आज जे भोगावे लागतेय त्याला कारणीभूत दुसरे तिसरे कोणी नसून शिवसेनाच आहे हे वास्तव प्रथम स्वीकारा आणि नंतरच अस्तित्वाची लढाई लढण्यास सामोरे जा. भाजपला संधी तुम्हीच दिली त्याचा त्यांनी उपयोग केला एवढेच.
…..विनायक एकबोटे, ज्येष्ठ पत्रकार नांदेड, दि. २०.२.२३
