तामसा/हदगाव, गजानन जिदेवार। तामसा – कोळगाव ता. हदगाव येथील एका शेतकऱ्यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे दीड लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना दि. 18 रोजी शनिवारी मध्यरात्री घडली आहे. चोरीच्या घटनेने पुन्हा एकदा तामसा भागात खळबळ उडाली असून सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.
तामसा येथून जवळच असलेल्या हदगाव तालुक्यातील कोळगाव येथील रहिवासी शेतकरी रावसाहेब दत्तराव पवार हे महाशिवरात्रीनिमित्त रात्रीला शिव मंदिरात कार्यक्रमासाठी गेले होते. रात्री साडेबाराच्या सुमारास ते घरी येऊन आपल्या कुंटुंबासोबत झोपले होते. अज्ञात चोरट्यांनी रात्री दीड ते दोनच्या दरम्यान प्रथम गेट फोडून घरात प्रवेश केला. ज्या खोलीत पवार कुटुंब झोपले होते. त्या खोलीचे दार चोरट्यांनी बाहेरून कडी लावून दुसऱ्या खोलीत प्रवेश केला. घरातील कपाटाच्या लॉकरमध्ये हरभरा विकून ठेवलेले नगदी एक लाख पाच हजार रुपये व अंदाजे दीड तोळा सोन्याचे दागिने चोरट्याने लंपास करुन चोरटे सहिसलामत निघून जाण्यात यशस्वी झाले. घडलेल्या चोरीच्या घटनेमुळे तामसा भागात चोरटे पुन्हा सक्रिय झाल्याची भीती व्यक्त होत आहे. चोरीच्या घटनेची खबर रात्रीच तामसा पोलिसांना दिली होती.
रविवारी सकाळी भोकर उपविभागीय अधिकारी श्रीमती शफकत आमना, सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंजाजी दळवे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. श्वान पथक व ठसेतज्ञाना पाचारण केले होते. मात्र चोरट्यांचा कोणताही मागमूस सापडला नाही. चोरी प्रकरणी गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया चालू होती. चोरीचा तपास लागणार का? मागील खंडीभर चोऱ्यांच्या तपासाप्रमाणे ह्या चोरीचा तपास ‘जैसे थे’ राहणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मागील 8 – 9 महिन्यापूर्वी तामसा शहर व परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घालत सोन्या चांदीच्या दागदागिन्यासाह लाखोंचा ऐवज लंपास करीत खंडीभर चोऱ्या करुन पोलिसांना आव्हान दिले होते. चोऱ्याचा छेडा लावण्यासाठी सपोनि मुंजाजी दळवे यांना तामसा ठाण्याला पाठवले होते. परंतु सपोनि दळवे यांनी अध्याप चोरीचा तपास लावला नाही की, चोरांच्या मुसक्या आवळल्या नाहीत. परंतु चोऱ्या बंद केल्याचा कांगावा करीत स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेण्याचा प्रकार केला होता. चोरीच्या घटनावर कंप्लीट नियंत्रण मिळविल्याच्या आविर्भावात वावरणाऱ्या सपोनि मुंजाजी दळवे यांना अज्ञात चोरट्यानी आव्हान दिले असून सपोनि दळवेना या चोरीचा तपास लागणार का? हे येणारा काळच सांगेल.