
नांदेड| गुरु रविदासांच्या सहाशे वर्षांपूर्वीच्या संकल्पनेतील स्वराज्य छ. शिवाजी महाराजांनी तीनशे वर्षांपूर्वी साकार केले असे प्रतिपादन अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी केले.

सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाजोन्नती मंडळ मालवणच्या वतीने लिलावती हॉटेल मालवण येथे गुरु रविदास व छ. शिवाजी महाराज संयुक्त जयंती महोत्सव कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर बोलत होते. मंडळाचे तालुकाध्यक्ष हरेश सदाशिव चव्हाण हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

आपल्या दिड तासाच्या ओघावत्या भाषणात इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर पुढे म्हणाले की, गुरु रविदासानी सहाशे वर्षांपूर्वी समतावादी व दु:खविरहित अश्या बेगमपुर राज्याची संकल्पना मांडली. याच संकल्पनेवर आधारित बहुजन हितकारी स्वराज्य छ. शिवाजी महाराजांनी साकार केले. या राज्यात सर्वसामान्य जनता सुखी होती.

गुरु रविदासांच्या महान लौकिक कार्याला लुप्त करण्यासाठी त्यांच्या नावाचे, चित्राचे आणि चरित्राचे सनातनी व्यवस्थेने विडंबन केले. ही चूक दुरुस्त करणे हे लायक वारसदारांचे कर्तव्य आहे. भविष्यात आमच्या महामानवांचा आणि आमचा कुणी अपमान करु नये यासाठी आम्ही संघटित होऊन लोकशाही व्यवस्थेत हक्कांसाठी संघर्षाची तयारी ठेवली पाहिजे असेही शेवटी चंद्रप्रकाश देगलूरकर म्हणाले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते महेश धामापुरकर यांनीही गुरु रविदास जीवन कार्यावर मार्गदर्शन केले. अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे कोंकण विभाग प्रमुख सुधाकर मानगावकर, मा. जिल्हाध्यक्ष इंजि. प्रकाश चव्हाण, सरचिटणीस चंद्रसेन पाताडे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. सर्वप्रथम दिपप्रज्वलन करुन महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. नंदकिशोर पाडगाकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले तर शेवटी देवेंद्र चव्हाण यांनी आभार मानले.

नांदोस ग्राम पंचायतच्या नवनिर्वाचित सरपंच सौ. माधुरी यशवंत चव्हाण, चौका ग्राम पंचायतच्या सरपंच सौ. विशाखा विजय चौकेकर व कांही ग्राम पंचायत सदस्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. दुसऱ्या सत्रात इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले.

