
नांदेड। जिअर स्वामी संस्थान श्री बालाजी मंदिर गाडीपुरा येथे ब्रह्मचारी रामानुज संप्रदायाचे उपासक अधिष्ठित महंत व्यंकटेशाचार्य गुरु लक्ष्मणाचार्य यांची नेमणूक करण्यात आली आहे. श्री बालाजी मंदिर गाडीपुरा येथे त्यांनी न्यासाच्या अधिष्ठित महंत पदग्रहण करावे व श्री बालाजी भगवान संस्थानची रामानुज परंपरेप्रमाणे पूजा अर्चना व सेवाभाव या उद्देशातून व्यंकटेशाचार्य गुरु लक्ष्मणाचार्य हे या मंदिराला लाभले असल्याने लाखो भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिअर स्वामी संस्थान श्री बालाजी मंदिर गाडीपुरा येथील विश्वस्त व कार्यवाहक सुरज सिंह माला, दीपक सिंह काशिनाथ सिंह रावत, मोहन सिंह नरसिंह भानसिंग रावत यांनी या प्रकरणात सह धर्मादाय आयुक्त औरंगाबाद यांच्याकडे दाद मागितली होती. सह धर्मदाय आयुक्त औरंगाबाद यांनी यासंदर्भात नुकताच एक अंतिम निकाल दिला असून, त्या आदेशान्वये पुजारी सच्चिदानंद लालन मिश्रा यांना विश्वस्त पदावरून बरखास्त करीत पाबंद देखील केले आहे. त्यामुळे मिश्रा यांना पुजारी म्हणून काम करण्याचा अधिकार राहिलेला नाही, असे सुरजसिंह माला, दीपकसिंह रावत व मोहनसिंह रावत यांनी सांगितले. जीअर स्वामी संस्थान श्री बालाजी मंदिर या ठिकाणी अधिष्ठित महंत म्हणून पदग्रहण करण्यासंदर्भात तसेच या ठिकाणी रामानुज परंपरेप्रमाणे व न्यासाच्या उपविधीप्रमाणे योग्य व्यक्तीची नेमणूक मंदिराचे प्रदत्त अधिष्ठित महंत म्हणून करण्याचे अधिकार देखील यांना प्रदान करण्यात आले आहेत.

त्यानुसार श्री भगवान बालाजी यांची पूजा अर्चना करण्यासाठी संस्थांनच्या परंपरेप्रमाणे योग्य व्यक्ती म्हणून ब्रह्मचारी रामानुज संप्रदायाचे उपासक अधिष्ठित महंत व्यंकटेशाचार्य गुरु लक्ष्मणाचार्य यांची नेमणूक करण्यात आली आहे. सह धर्मदाय आयुक्त औरंगाबाद यांनी या प्रकरणात निकाल देत असताना या संस्थांनचे नऊ विश्वस्त निलंबित करत रद्दबातल ठरविले आहेत. त्यामध्ये सच्चिदानंद लालन मिश्रा, सुरज प्रसाद काशी प्रसाद यादव, डॉ. राम रतन सिंग बिसेन , लड्डूसिंघ महाजन, नरेंद्रपाल बरारा , दादाराव बाबाराव ढोणे, बनारसीदास रामजीलाल अग्रवाल ,नंदकिशोर गोविंद नारायण सोमानी, रमेशसिंह तेहरा यांचा समावेश आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या बालाजी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम जवळपास बंद असल्यातच जमा झाले होते. परंतु आता पुन्हा या मंदिरात पूर्वीप्रमाणे श्री बालाजी भगवानची पूजा- अर्चना व विविध धार्मिक उत्सव होणार असल्याचे स्वामी वेंकटेशाचार्य यांनी कळविले आहे.

