
नांदेड। नांदेड शहरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस जटील बनत चालला आहे. नांदेडकरांना वाहतूकीच्या कोंडीतून मुक्त करण्यासाठी नांदेड शहरात चार उड्डाणपुल निर्माण करण्याची गरज आहे.

ग्रामीण भागातील तीन राष्ट्रीय महामार्गास मंजूरी देवून श्री गुरुगोविंदसिंघजी स्टेडियम येथे आयपीएल मॅच सुरु करण्याची मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना.नितीनजी गडकरी यांच्याकडे नांदेड दौर्यात करणार असल्याची माहिती नांदेडचे भाजपा खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना नांदेड येथील स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडाविद्यापीठाच्यावतीने डी.लीट ही मानाची पदवी देण्याचे घोषीत करण्यात आले. त्यानिमित्त ना.गडकरी हे आज नांदेड दौर्यावर येत आहेत. नांदेड विद्यापीठाच्यावतीने डी.लीट ही पदवी देवून ना.गडकरी यांना सन्मानीत करण्यात येणार आहे.

नांदेड दौर्यावर असलेले ना.नितीन गडकरी हे खा.चिखलीकर यांच्या निवासस्थानास भेट देणार आहे. या भेटीदरम्यान खा.चिखलीकर यांनी शहराच्या विकासात भर टाकून नांदेड शहराचा चेहराम्होरा बदल करण्यासाठी शहारत चार ठिकाणी उड्डाण पुल निर्माण करण्याची नितांत गरज असल्याचे खा.चिखलीकर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. शहरातील आयटीआय चौक ते अण्णाभाऊ साठे चौक, नागार्जूना, नमस्कार चौक असा उड्डाण पुल करण्यात यावा. जुनामोंढा, महावीरचौक, वजीराबाद, कलामंदिर, शिवाजीनगर आयटीआय असा दुसरा उड्डाण पुल मंजूर करावा. आयटीआय ते श्रीनगर, राजकॉर्नर असा तीसरा उड्डाण पुल निर्माण करावा.

जुन्या नांदेड शररातील बरकतअली कॉम्पलेक्स (देगलूरनाका) वाजेगांव या मार्गावर चौथा उड्डाणपुल तयार करावा अशी मागणी खा.चिखलीकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे एका निवेदनाव्दारे करणार आहेत. नांदेड शहरातील गुरुगोविंदसिंघजी स्टेडियण अत्याधुनिकपध्दतीने तयार करण्यात आले आहे. या स्टेडियमवर आयपीएल क्रिकेट मॅच सुरु करण्यास परवानगी देवून नांदेडकरांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात अशी मागणीही खा.चिखलीकर यांनी केली आहे.

शहराच्या विकासाबरोबरच ग्रामीण भागातील राष्ट्रीय महामार्ग 361 एफ खरवंडी-राजूरी बीड-परळी पर्यंत चार लाईनचे काम पूर्ण झाले असून गंगाखेड ते लोहा हा 42 कि.मी.च्या रस्त्याचे काम शिल्लक राहिले आहे. सदर रसत्याच्या कामाला मंजूरी द्यावी. राष्ट्रीय महामार्ग 63 उदगीर-देगलूर-आदमपूर-सगरोळी-कार्लाफाटा या 82 कि.मी.लांबीच्या रस्ता सुधारणेला मंजूरी द्यावी. राज्य मार्ग करखेड-औराद हा 35 कि.ंमी. अंतराचा रस्ता तीन राज्यांना जोडणारा असून या रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग घोषीत करुन सुधारणेला मंजूरी द्यावी. गडगा मांजरम-आंचोली-गंगनबीड-कुंटूर-राहेर ते तेलंगना सीमा असा राष्ट्रीय महामार्ग मंजूर करावा. लोहा येथे गेल्या कांही महिन्यापूर्वी झालेल्या कार्यक्रमात आपण जाहीर शब्द देवून लोहा-कंधार-बारुळ-गडगा या दोन राज्यांना जोडणार्या रस्त्यास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याचे आश्वासन दिले होते तरी या रस्त्यास राष्ट्रीय महामार्ग म्हणून मंजूरी द्यावी अशी मागणीही खा.चिखलीकर यांनी केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे केली आहे.

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळापासून रस्ते विकासाला फारमोठठ्या प्रमाणात केंद्रीय रस्ते विकास मंत्री ना.नितीन गडकरी यांनी दिल्यामुळेच नांदेड जिल्ह्यात सर्वत्र राष्ट्रीय महामार्गाचे जाळे मोठ्या प्रमाणात सुरु झाले आहे. पुढच्या वर्षापर्यंत रस्त्यांची कामे पूर्ण होवून रसत्याचे लोकार्पण होईल. केंद्रात व राज्यात भाजपाचे डब्बल इंजिनचे सरकार आल्यामुळे नांदेडकरांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. गुरु-ता-गद्दीच्या काळात मोठ्या प्रमाणात निधी नांदेडला मिळाला असला तरी त्या निधीचा योग्यपध्दतीने नियोजन न झाल्यामुळे शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस वाढत गेली आहे. त्यामुळे नांदेड शहराच्या वाहतुकीची जटील समस्या सोडविण्याची केंद्रीय रस्ते विकास मंत्री या नात्याने आपण पुढाकार घेवून शहरातील या चार उड्डाण पुलास मान्यता द्यावी अशी आग्रहाची मागणी खा.चिखलीकर यांनी केली आहे.

देशातील रस्ते विकासाचे शिल्पकार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज दि.24 फेब्रुवारी रोजी दुपारी 4.30 वाजता हिंगोली गेट स्टेशनरोड गुरुव्दारा मैदान येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेत ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते मुदखेड-नांदेड या राष्ट्रीय महामार्गाचे भूमीपूजन ऑनलाईन करण्यात येणार आहे. नांदेड-जळकोट,कुंद्राळा-वझर,भोकर-सरसम, बारसगाव-राहटी या राष्ट्रीय महामार्गाचे लोकार्पण करण्यात येणार आहे, तरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरीकांनी उपस्थि रहावे असे आवाहन नांदेड भाजपाचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर, नांदेड जिल्हा भाजपाचे अध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगांवकर, शहर भाजपा जिल्हाध्यक्ष प्रविण साले यांनी केले आहे.
