नांदेड। अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणासाठी सकल मातंग समाजाच्या वतीने मुंबई येथील आझाद मैदानात आयोजित कार्यक्रमात बोलताना नांदेडचे भूमिपुत्र समाजभूषण म्हणून सर्वपरिचित असणारे सामाजिक नेते नारायण गायकवाड म्हणाले की, डॉ. अण्णा भाऊ साठे प्रशिक्षण व संशोधन संस्था (आर्टी) ची स्थापना करण्यासाठी काहीही करण्याची तयारी असायला हवी तसेच आरक्षण वर्गीकरणाचा अबकड हा विषय राष्ट्रीय नेते मंदाकृष्णा मादिगा यांच्या पुढाकारातून केंद्र शासनाकडून सोडवू , क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाच्या शिफारशी समाजातील प्रतिनिधी मार्फत कॅबीनेटमध्ये पाठवून लागू करुन घेवू उर्वरीत म्हणजे शेवटचा विषय मुंबई विद्यापीठाचे नामांतर करुन डॉ.अण्णा भाऊ साठे विद्यापीठ असे नामकरण करावे.
कारण मातंग समाज हा अनुसुचित जातीतील मागासवर्गीय घटकातील सर्वात दबलेला व विकासापासून कोसोदूर असलेला घटक आहे. जो गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने शासनाचे लक्ष वेधून उपरोक्त मागण्या घेवून शासनाच्या दरबारात अनेक वर्षे येरझारा घालत आहे. याउपरही समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास या मागण्या पूर्ण होण्यासाठी वेळेप्रसंगी रक्त विकेल पण समाजाला न्याय दिल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही. असेही उद्गार नारायण गायकवाड यांनी कार्यक्रमात बोलताना म्हणाले.
पूढे बोलताना गायकवाड म्हणाले की, विविध भागातून समाजातील उच्च विद्या विभूषित तसेच सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळीच्या प्रमुख उपस्थितीत येत्या १८ मार्च रोजी मातंग समाज आत्मचिंतन परिषद घेणार असून लवकरच या परिषदेचे ठिकाण कळविले जाईल मात्र या परिषदेस उपस्थित राहून उपरोक्त मागण्या संदर्भाने काय उपाययोजना करता येतील या संबंधी चर्चा करण्यात येईल असेही ते यावेळी म्हणाले.