
नांदेड| केंद्र आणि राज्य सरकारकडे मराठवाड्याच्या विकासाचे अनेक प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करुन मराठवाड्याच्या विकासाला गती द्यावी अशी मागणी केंद्रीय रस्ते व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेवून मराठवाडा जनता विकास परिषदेच्या शिष्टमंडळाने केली आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री शुक्रवारी नांदेड मुक्कामी असतांना मराठवाडा जनता विकास परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष माजी खा.डॉ. व्यंकटेश काब्दे यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने भेट घेवून मराठवाडा विकासाच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात मराठवाडा वैधानिक विकास मंडळाला मुदतवाढ द्यावी, राज्य मंत्रिमंडळाची बैठक औरंगाबादला घेण्यात यावी, मराठवाड्याचा भौतिक अनुशेष तात्काळ भरुन काढावा, विभागीय अनुशेष काढण्यासाठी नवीन समिती स्थापन करावी, लोकसंख्येच्या प्रमाणात सरकारी नोकर भरतीचा अंमल करावा, मराठवाड्यातील वैद्यकीय सुविधांचा वाढता अनुशेष भरुन काढावा. मानव विकास अहवालाप्रमाणे मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांपैकी पाच जिल्हे विकास निर्देशाकांत खालच्या गटात आहेत, यावरुनच मराठवाड्यातील वैद्यकीय सेवेचा अनुशेष लक्षात येतो.

मराठवाड्यात 2 हजार 982 आरोग्य उपकेंद्रांची गरज असतांना केवळ ती 885 ने कमी आहेत, वैद्यकीय महाविद्यालयातून प्रवेश क्षमतेचा अनुशेष भरुन काढावा, वाढत्या मनोरुग्णांची संख्या लक्षात घेता मराठवाड्यात मनो रुग्णालय स्थापन करावे, जालना आणि लोखडी सावरगाव येथे मनोविकार तज्ञांच्या तात्काळ नेमणुका कराव्यात, मराठवाड्याचा सिंचनाचा अनुशेष भरुन काढावा, आयआयटी, एम्स, इंडियन इन्स्टीट्युट ऑफ मॅनेजमेंट सारख्या मंजूर झालेल्या केंद्रीय शैक्षणिक संस्था कार्यान्वीत करुन मराठवाड्याच्या शैक्षणिक विकासाला गती द्यावी, औरंगाबाद येथे विधी विद्यापीठ स्थापन करावे, नांदेड येथे आयुर्वेद विद्यापीठाची स्थापना करावी.

अंबाजोगाई येथे आद्यकवी मुकूंदराज मराठी विद्यापीठ स्थापन करावे, औरंगाबादच्या इन्स्टीट्यूट ऑफ सायन्सला राष्ट्रीय संस्थेचा दर्जा देण्यात यावा, औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा देण्यात यावा, रस्ते व रेल्वे विकासाचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत. या निवेदनावर माजी खा.डॉ.व्यंकटेश काब्दे, द.मा.रेड्डी, शंतनु डोईफोडे, ऍड.कॉ. प्रदीप नागापूरकर, प्रा.डॉ.अशोक सिद्धेवाड, संभाजी शिंदे आदींच्या स्वाक्षर्या आहेत.

