
पुणे| इन्फोसिस फाऊंडेशन आणि भारतीय विद्या भवनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत दोन दिवसीय ‘इंडिया इंटरनॅशनल डान्स फेस्टिव्हल’चे शानदार उद्घाटन रविवारी सकाळी झाले. २६,२७ फेब्रुवारी रोजी दोन दिवस हा फेस्टिव्हल होत आहे. २६ रोजी सकाळी १० ते दुपारी १ आणि २७ रोजी सायंकाळी ६ वाजता या फेस्टिव्हलमधील नृत्य सादरीकरणे सरदार नातू सभागृह (भारतीय विद्या भवन,सेनापती बापट रस्ता ) येथे होत आहेत.

फेस्टिव्हल चे उदघाटन नृत्य प्रशिक्षक शांभवी दांडेकर(अमेरिका) यांच्या उपस्थितीत झाले.इंडिया इंटरनॅशनल फेस्टिव्हल चे संस्थापक श्याम हरी चक्र, नंदकुमार काकिर्डे,शांभवी दांडेकर,रसिका गुमास्ते, अस्मिता ठाकूर, नेहा मुथियान उद्घाटनप्रसंगी उपस्थित होते.

श्याम हरी चक्र म्हणाले, ‘नृत्याला प्रोत्साहन देणे हे सर्वांचे काम आहे. मात्र, सरकारने विशेष पुढाकार घेतला पाहिजे. नृत्य कलाकारांना मोठा संघर्ष करावा लागतो, त्यात समाजाची कौतुकाची थाप पाठीवर पडण्यासाठी अशा महोत्सवाची गरज आहे. सर्व शहरात असे नृत्य महोत्सव भरले पाहिजेत. शांभवी दांडेकर म्हणाल्या, ‘ अमेरिकेतही भारतीय नृत्यप्रकारांना प्रतिसाद मिळत आहे. अशा नृत्यमहोत्सवातून कलाकारांना संधी मिळणे मोठी गोष्ट ठरते.कलेचे आदानप्रदान करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करूया.

२६ रोजी अथर्व चौधरी,मधुस्मिता पॉल,के.कीर्थना(भरतनाट्यम),सानिका देवधर ,मानसी भागवत (कथक),साई बक्षी,अन्वेष मोहंती(ओडिसी),युक्ता जोशी,अभिषेक धावडे तसेच ऋचा चितळे(कथक पाठशाला),अवनी भाटवडेकर(नृत्यावली फाउंडेशन),गायत्री काळे (कल्याणी काणे आणि अंतर्नाद यांची शिष्या )या विशेष कलाकारांचे नृत्य सादरीकरण आयोजित करण्यात आले होते.

२७ फेब्रुवारी रोजी अनेक संस्था आणि कलाकार सादरीकरणे करणार आहेत. त्यात नादब्रह्म नृत्यालय, मुद्रा सेंटर ऑफ परफॉर्मिंग आर्टस् ,नृत्यशाला ऍकेडमी ऑफ फाईन आर्टस् ,सायली काणे,इशा ,वैष्णवी (भरतनाट्यम),अक्रम डान्सकंपनी ,कंटेम्परी अँड नीलिमा प्रॉडक्शन्स ,ज्योती मनसुखानी (कथक) यांचा समावेश आहे. हा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य आहे.भारतीय विद्या भवन चे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

