
हिमायतनगर। “लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी। जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी।।” कवी सुरेश भट यांच्या या ओळीने प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. शिवाजी भदरगे यांनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आपल्या मनोगताला सुरुवात करुन म्हणाले की, आपल्या प्रत्येकाला मराठी भाषेचा अभिमान आहे. काय काय दिलं मराठीने नाटक, सिनेमा, गाणी, साहित्य, अन्य अनेक प्रकारातील साहित्यांनी किती समृद्ध केलय आपल्याला. आज माय मराठीचा गौरव दिन गौरव न करता मराठी भाषेच्या संदर्भामध्ये चिंतन होणे देखील गरजेचे आहे.

कवी कुसुमाग्रज मराठीतील एक श्रेष्ठ आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार आहेत. कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर होत. अशाप्रकारे कुसुमाग्रजांचे साहित्यातील योगदान पाहता त्यांचा जन्मदिवस “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषा ही भारतातील प्रमुख 22 भाषांपैकी एक आहे. मराठी ही महाराष्ट्र, गोवा या राज्यांची अधिकृत राजभाषा आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकसंख्येनुसार ती जगातील 15 वी आणि भारतातील 04 ती भाषा आहे.

पुढे बोलताना म्हणाले की, काळानुसार मराठीच्या उगमापासून ते सध्याच्या मराठीच्या स्वरूपामध्ये अनेक बदल झाले. त्यातूनच मुख्य मराठी, अहिराणी मराठी, मालवणी मराठी, वराडी मराठी, कोल्हापुरी मराठी असे पोट प्रकार पडत गेले. ही बोलीभाषांची विविधता आहे आणि तेच तिचं खरं वैभव आहे. अहिराणी मराठी मध्ये अनेक भाषांचा समावेश होतो. अनेक देशांमध्ये 44 मराठी रेडियो केंद्र आहेत. त्यावरती आजही मराठीतून कार्यक्रम होतात. आपल्या मराठी भाषेतील ल, ळ या दोन अक्षरांचे उच्चार जवळपास पूर्ण मिळते जुळते आहेत, मात्र त्यातून वेगळे अर्थ ध्वनीत करण्याचे सामर्थ्य मराठी भाषेतच आहे. ळ चा उच्चार जगातील दुसऱ्या कोणत्याही भाषेत नाही.

पुढे बोलताना ते म्हणाले की, मराठीला जागतिक ज्ञानभाषा बनविण्यासाठी इंग्रजी च्या तुलनेत मराठी भाषेची उपयोगिता वाढवावी लागेल. इंग्रजी शाळेच्या बरोबरीने मराठी शाळांची गुणवत्ता वाढीवर भर देने काळाची गरज आहे. ज्ञान विज्ञान, तंत्रज्ञान व कम्प्युटर, मोबाईलची भाषा म्हणून मराठीला आगामी काळात समृद्ध करावे लागेल. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव या संतांनी मराठीला समृद्ध केल. तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मराठी भाषेचे आंदोलन करून इंग्रजीला पर्यायी भाषा निर्माण करत मराठी ला समृद्ध केल. मराठी भाषेचे वर्तमानात व्यवहार भाषा, ज्ञानभाषा अविष्कार भाषा म्हणून वापर करणे गरजेचे आहे.

मराठी विषयी केवळ पोकळ अभिमान बाळगण्याऐवजी कृतीशील धोरण आखून भाषा टिकवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. आपण दैनंदिन संभाषण, ज्ञान व्यवहार, वाचन लेखन हे मराठीतूनच आवर्जून करायला हवे. केंद्राकडून मराठी ला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ते आज ना उद्या मिळेल. पण आपण मात्र केवळ एक दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करुन एवढ्यावरच न थांबता अगदी 365 दिवस मराठी भाषेचा वापर करायला हवा.

हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाच्या मराठी विभागाकडून कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी तसेच हिंदी विभागाचे प्रा. डॉ. शिवाजी भदरगे हे लाभले होते. तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून मराठीचे विभाग प्रमुख व कार्यक्रमाचे संयोजक डॉ. एल. एस. पवार व प्रा. वसुंधरा आदी उपस्थित होते. सुरुवातीला मंचावरील मान्यवरांनी वीर हुतात्मा जयवंतराव पाटील तसेच कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन व द्विपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मंचावरील मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. एल. एस. पवार यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. राजू धुळे यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयाचा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी आणि तसेच मोठ्या प्रमाणात विद्यार्थी विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
