हिमायतनगर। राज्य शासनाने बंदी घातलेल्या गुटख्याची विना परवानगी विक्री करण्यासाठी हिमायतनगर शहरातील विविध ठिकाणी मोठया प्रमाणात साठा केला जात आहे. दिवसा ढवळ्या हे धंदे चालविले जात असताना स्थानिक पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नसल्याची ओरड होत होती. उपविभागीय पोलीस अधिकारी शफकत आमना यांना गुप्त खबऱ्याकडून मिळालेल्या गुप्त माहिती वरुन रविवारी मध्य रात्रीला छापा टाकून गुटखा जप्त केला होता. या साठ्याची अन्न औषध प्रशासन अधिकाऱ्यांनी मोजदाद केल्यानंतर पकडलेला तो साठा 20 लाखाचा होता असे सांगितले जाते आहे.
गुटख्याची कार्यवाही झाल्यानंतर गुटखा किती होता याकडे सर्वांचे लक्ष लागून होते, अखेर आज दि २८ अन्न व औषधी प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त यांनी सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ व विविध कंपनीच्या गुटख्याची मोजदाद केली, यात १९ लक्ष ९२ हजार ८५२ रुपयांचा साठा असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणी हिमायतनगर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शेख मलिक शेख हलीम रा.बागवान गल्ली, हिमायतनगर याच्यावर भारतीय दंड विधान कलम 188, 272, 273, व 328, तसेच अन्न सुरक्षा कायदा 2006 चे कलम 26, 27, 30, (2) (A) 59 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल होताच संबंधित गुटखा माफिया फरार असल्याचे सांगितले जाते आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बी.डी.भुसनूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी महाजन हे करीत आहेत. शहरात असलेल्या एका गुटखा माफियावर कार्यवाही झाल्यानंतर अवैध गुटखा विक्रीचा गोरखधंदा करणाऱ्या ईतर गुटखा माफियाचे धाबे दणाणले आहेत.
यानंतर हिमायतनगर पोलिस शहर व तालुक्यात सुरुवात असलेल्या अवैद्य धंद्याला लगाम लावतील की पूर्वीप्रमाणे काही दिवसांनी सर्व अवैद्य धंद्याला खुलेआम छूट देतील हे आगामी काळात पहावयास मिळणार आहे.