नांदेड। महाराष्ट्र मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न , नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या नवीन सदस्य नोंदणीची प्रक्रिया सद्या वेगात सुरू असून नांदेड शहरासह ग्रामीण भागातील पत्रकारांचा त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तसेच त्यासाठी दि.२८ फेब्रुवारी २०२३ पर्यंत मुदत देण्यात आली होती . परंतु जिल्ह्यातील कोणताही इच्छुक पत्रकार नाव नोंदणीपासून वंचित राहू नये यासाठी बहुतांश पत्रकारांची वाढती मागणी लक्षात घेऊन या सदस्य नोंदणी प्रक्रियेस येत्या ५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ निर्णय देण्याचा निर्णय जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी यांनी घेतला आहे.
नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या तालुकानिहाय सदस्य नोंदणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून त्याविषयीची जबाबदारी उपाध्यक्ष,जिल्हा संघटक व अन्य पदाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहे. त्यानुसार सर्व तालुका स्तरावरील विद्यमान अध्यक्ष व सचिव ही सदस्य नोंदणी करून घेत आहेत. तसेच नांदेड शहर आणि तालुक्यातील सदस्य नोंदणीची जबाबदारी जिल्हा उपाध्यक्ष सुनील पारडे, सतीश मोहिते, शिवराज बिच्चेवार आणि जिल्हा प्रसिध्दी प्रमुख माधव गोधणे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
तसेच धर्माबाद आणि बिलोली तालुक्यासाठी जी. पी.मिसाळे, राजेंद्र कांबळे, हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यासाठी प्रकाश जैन, सुनील व्यवहारे, नायगाव आणि देगलूर तालुक्यासाठी रामचंद्र भंडरवार, पंडित वाघमारे ,सुभाष पेरकेवार, भोकर, उमरी तालुक्यासाठी एल.ए.हिरे, अर्धापूर आणि मुदखेड तालुक्यासाठी प्रताप देशमुख, माहूर आणि किनवट तालुक्यासाठी फुलाजी गरड तर मुखेड कंधार आणि लोहा तालुक्यासाठी संदीप कामशेटे, गणेश लोखंडे आणि रत्नाकर महाबळे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
तरी जिल्ह्यातील पत्रकारांच्या विविध समस्या आणि अडचणी वेळीच मार्गी लावण्यासाठी तसेच पत्रकारांची भक्कम एकजूट दाखवून देऊन अन्यायाविरुध्द खंबीरपणे उभे राहण्यासाठी अधिकाधिक पत्रकारांनी सदस्य नोंदणीत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी ,जिल्हा कार्याध्यक्ष संतोष पांडागळे , जिल्हा सरचिटणीस राम तरटे आणि जिल्हा प्रसिध्दी प्रमुख माधव गोधणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.