
नांदेड| बालसाहित्य लिहावयाचे असेल तर बालकांमध्ये रमावे लागेल. त्यांच्या भावभावनांमध्ये मिसळून जावे लागेल तरच उत्तम तऱ्हेचे बालसाहित्य लिहिता येते. याप्रमाणे पंडित पाटील यांनी आपल्या ‘गोडगाणी’ या बालकवितासंग्रहातून बालकांच्या भावनांना जपले आहे. असे उद्गार प्रसिद्ध ग्रामीण कवी शंकर वाडेवाले यांनी काढले.

अखिल भारतीय साहित्य परिषद जिल्हा शाखा नांदेड व इसाप प्रकाशनाच्या वतीने ‘मराठी भाषा गौरवदिन – विचारमंथन’ व पंडित पाटील लिखित ‘गोडगाणी’ या बालकवितासंग्रहावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामीण कवी शंकर वाडेवाले हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी व कवी वीरभद्र मिरेवाड उपस्थित होते.

प्रारंभी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला व दीपप्रज्वलन करण्यात आले. अ. भा. साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष दत्ता डांगे यांनी प्रास्ताविक केले. तर मनोगत पंडित पाटील यांनी व्यक्त केले. मनोगतात त्यांनी पहिली वर्गाच्या मुलांपासून जे मला मिळाले ते या बालकवितांमधून मांडले आहे असे म्हटले. वाडेवाले पुढे म्हणाले की, ‘गोडगाणी’तील कविता सहज, सोप्या व गेय असल्याने बालके सहज गुणगुणायला लागतील. मुलांचा खरा आदर्श हे गुरुजी असतात. पंडित पाटील हे गुरुजी असल्याने त्यांनी हा आदर्शही सांभाळला आहे असे म्हटले.

व्यंकटेश चौधरी यांनी म्हटले की, गुरुजी किंवा आईनेच बालकविता लिहावी असे म्हटले जाते परंतु गुरुजी आणि आई ज्या कवीच्या ह्रदयात आहे तोच उत्तम बालकविता लिहू शकतो. मुलांमध्ये जगून लिहिणे आणि कल्पना करून लिहिणे मोठं अंतर आहे. पंडित पाटील यांच्या कवितेतून आईच्या मायेचा पदर आहे. या कविता बालकांना दिशा देणाऱ्या आहेत असेही त्यांनी म्हटले.

वीरभद्र मिरेवाड यांनी कवितेविषयी बोलताना म्हटले की, बालश्रीकृष्णासारख्या बाललीला या ‘गोडगाणी’तून आलेल्या आहेत. बालकांत रमलेला हा कवी आहे. पंडित पाटलांची कविता ही फुलांसारखी फुलते. गंध दरवळते. कल्पकता आणि तरलता या बालकवितेत आहे असेही त्यांनी म्हटले.

या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन आनंद पुपलवाड यांनी केले तर अशोक कुबडे यांनी आभार मानले. कार्यक्रमास देवीदास फुलारी, प्रा. डॉ. अनुराधा पत्की, प्रा. डॉ. शशिकांत तोळमारे, शिवाजी आंबुलगेकर, बाबाराव विश्वकर्मा, प्रा. पंडित शिंदे, आनंद कदम, गजानन हिंगमिरे, नरेंद्र नाईक, प्रा. महेश मोरे, प्र. श्री. जाधव, राजीव पुपलवाड, लक्ष्मी पुरणशेट्टीवार, वसुंधरा सुत्रावे, प्रा. पंडित शिंदे, जीवनराव शिंदे, शंकर राठोड, दिगंबर बा. जाधव, गिरीश कहाळेकर, एन. सी. भंडारे, बालाजी मांजरमकर, मनोहर बसवंते, बालाजी जबडे, प्रकाश इंगोले, डी.एन.मोरे खैरकेकर, दिगंबर कानोले,रविंद्र पांडागळे आदी उपस्थित होते.

