
नांदेड| प्रख्यात समाजवादी नेते सदाशिवराव पाटील यांच्या जयंती निमित्त सदाबहार फाऊंडेशनच्या वतीने दिला जाणारा यंदाचा कार्यकर्ता गौरव पुरस्कार राज गोडबोले यांना जाहीर झाला आहे. 3 मार्च रोजी नरहर कुरुंदकर सभागृहात होणार्या समारंभात भारतीय लोकशाही पुढील आव्हाने या विषयावर राष्ट्रसेवा दलाचे विचारवंत सुभाष वारे हे व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफणार आहेत.

प्रख्यात समाजवादी नेते साथी सदाशिवराव पाटील यांच्या जयंती निमित्त सदाबहार फाऊंडेशनच्या वतीने दरवर्षी व्याख्यान व कार्यकर्ता गौरव पुरस्कार प्रदान सोहळा शुक्रवार दि.3 मार्च रोजी पीपल्स महाविद्यालय परिसरातील नरहर कुरुंदकर सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता ‘भारतीय लोकशाही पुढील आव्हाने’ या विषयावर राष्ट्रसेवा दलाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ समाजवादी विचारवंत सुभाष वारे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

याच कार्यक्रमात आंबेडकरवाद व मार्क्सवादी चळवळीतील कार्यकर्ते, लेखक राज नामदेवराव गोडबोले यांना यंदाचा दुसरा कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खा.डॉ. व्यंकटेश काब्दे हे राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून वसमतच्या बहिर्जी स्मारक एज्युकेशन सोसायटीचे सचिव तथा माजी आ.पंडितराव देशमुख हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सीए डॉ.प्रविण पाटील, सदाबहार फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा.डॉ.अशोक सिद्धेवाड, सचिव गणेश पाटील, सुर्यकांत वाणी, प्रो.लक्ष्मण शिंदे, प्रो.राजेश सोनकांबळे, ऍड.प्रदीप नागापूरकर आदींनी केले आहे.

