
नवीन नांदेड| विज्ञानाची कास धरा, आपल्या सभोवती निसर्गात घडणाऱ्या घटना मागे कोणते वैज्ञानिक सत्य आहे ते शोधून काढा व चांगले संशोधक बना असे आवाहन शिक्षणधिकारी डॉ. सौ.सविता बिरगे यांनी जिल्हा परिषद हायस्कूल विष्णुपूरी येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त २८ फेब्रुवारी रोजी आयोजित कार्यक्रमात केले.

भारतीय भौतिक शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकट रामन यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी रामन परिणामाचा शोध लावला. यासाठी त्यांना नोबल पुरस्काराने गौरवण्यात आले. तेव्हापासून 28 फेब्रुवारी हा दिवस आपण राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करतो. या दिनाचे औचित्य साधून आदर्श शाळा जिल्हा परिषद हायस्कूल विष्णुपुरी येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. यावेळी एमजीएम इंजिनीअरिंग महाविद्यालयाचे तसेच टिकोजीराव ग्रंथालय विष्णुपूरीचे प्रेरणास्त्रोत डॉ.गोविंद हंबडे यांनी लोकांच्या दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या विज्ञानाचे महत्त्व सांगण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिन दरवर्षी साजरा केला जातो असल्याचे सांगितले.

विज्ञान दिनाचे औचित्य साधून प्रशाळेमध्ये इयत्ता पहिली ते दहावीच्या मुलांनी जवळपास 127 छोट्या मोठ्या प्रयोगाचे सादरीकरण केले या साठी 252 बालवैज्ञानिकांनी प्रयोगाच्या सादरीकरणामध्ये सहभाग नोंदवला. छोट्या छोट्या मुलांनी केलेल्या प्रयोगाचे सादरीकरण पाहून उपस्थित पालक वर्ग तसेच ग्रामस्थ यांनी आनंद व्यक्त केला मुलांचे भरभरून कौतुक केले.शाळेच्या प्रशस्त अशा प्रांगणामध्ये प्रयोगाची मांडणी व्यवस्थितरीत्या करण्यात आली होती. तसेच वेगवेगळे प्रयोग आणि त्यातून मुलांना होणारा आनंद हा प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर पाहताक्षणीच जाणवत होते.

या प्रंसगी उपशिक्षणाधिकारी बंडू आमदूरकर ,राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक राजेश कुलकर्णी, अनिल हंबर्डे, विश्वनाथराव हंबर्डे ,डॉ गोविंद हंबर्डे ,क्रियाशील पालक राजेश हंबर्डे, नरसिंह हंबर्डे ,प्रवीण हंबर्डे ,दिग्विजय हंबर्डे,सूनदाताई हंबर्डे,अमरजित कौर शिलदर, मुख्याध्यापक एन.एन.दिग्रसकर, उपक्रमशील विज्ञान शिक्षक उदय हंबर्डे ,विज्ञान शिक्षक कृष्णा बिरादार, आनंद वळगे ,सोमनाथ बिदरकर, विकास दिग्रसकर, खदीर सर ,डी के केंद्रे,उद्धव धनगे,सदानंद गुरुपवार, कविता कलेटवार, मीरा रेवनवार,वैशाली कुलकर्णी ,अर्चना देशमुख तसेच पालक, विद्यार्थी व सर्व शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यात मोलाचा वाटा उचलला.

