नवीन नांदेड। महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२१ या परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर करण्यात आली,यामध्ये नांदेडच्या सिडको भागातील बालाजी शिवाजी कदम ह्यांनी राज्यात बारावा तर जिल्हयात पहिला येण्याचा मान मिळवला आहे.
एमपीएससीने पत्रकाद्वारे प्रसिध्द केलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२१ चा निकाल जाहीर केला. या परीक्षेत राज्यातील यादीत नांदेड जिल्हयातील सर्वसामान्य कुंटुंबातील बालाजी शिवाजीराव कदम यांनी बारावा येण्याचा मान मिळवला आहे तर नांदेड जिल्हयात पहिला मान पटकवला आहे. त्यांनी पहिले ते दहावी इयत्तेपर्यंतचे शिक्षण सिडको येथील शिवाजी विद्यालयात तर पदवी अभ्यासक्रमाचे शिक्षण श्रीगुरुगोविंदसिंघ अभियांत्रिकी महाविद्यालय विष्णुपुरी येथुन घेतले आहे.
वडील शिवाजीराव कदम हे सिडको औद्योगिक वसाहतील टेक्सकाँम येथे कामगार होते. त्यांनी मुलाचा अभ्यासातील व्यासंग पाहुन त्याला त्याच्या आवडीचे शिक्षण दिले. गेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेत तो उतीर्ण झाला होता. त्यांनी यूपीएससी परिक्षे़ची तयारी केली होती; परंतु अल्प गुणांनी त्यात त्याला अपयश आले होते. अपयश आल्याने त्याने खचून न जाता जिद्दीने अभ्यासावर लक्ष केंद्रीत करुन २०२१च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेची तयारी करुन यश मिळवले. त्याच्या या यशाबद्दल सिडको-हडको परिसरासह गोळेगाव (पउ) येथील नागरिकांनी कौतुक केले आहे.