
हदगाव, गजानन जिदेवार। आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून शेती करत असताना शेतकऱ्यांनी जमिनीचा सेंद्रिय कर्ब सांभाळावा अन्यथा शेती नापीक झाल्याशिवाय राहणार नाही,असे प्रतिपादन डॉ. विजयकुमार सुर्यवंशी यांनी मरडगा येथे शिवकल्याण बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने शिवजयंती निमित्तआयोजित केलेल्या कार्यक्रमात केले.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवकल्याण बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने शिवजयंती निमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजित केल्या जाते. यामध्ये कृषी व सामाजिक क्षेत्रात समाजासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तीसाठी समाज रत्न पुरस्कार व कृषीमध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कृषी रत्न पुरस्कार दिल्या जातो. यावर्षीचा समाज रत्न पुरस्कार गजानन सोळंके हस्तरा यांना देण्यात आला. तर कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कृषी रत्न गौरव पुरस्कार डॉ. विजयकुमार भिमराव सुर्यवंशी यांना देण्यात आला.

यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते, शेतकऱ्यांनी शेती करत असताना केवळ उत्पन्न वाढवणे हाच हेतू मनात न बाळगता अधिक नफा कसा मिळेल, याकडे लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. आधुनिक शेती करत असताना प्राचीन शेती पद्धतीचे अनुसरन करीत सेंद्रिय शेती ही एक काळाची गरज बनली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष गजानन चौतमाल उपाध्यक्ष डॉ. दीपक काळे, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष काळे यांच्यासह अनेक शेतकरी व शिवप्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन चौतमाल यांनी केले तर आभार पोलीस पाटील प्रल्हाद काळे यांनी मानले.

