नांदेड। शासन निर्देशांनुसार नाफेड मार्फत हमी भावाने हरभरा खरेदी केंद्र सुरु करावेत अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बालाजी बच्चेवार यांनी केली आहे.
नाफेड मार्फत आठ राज्यस्तरीय संस्थांमार्फत हरभरा खरेदी होणार असल्याचे शासनाने सांगितले व तशा पद्धतीची नोंदणी शेतकऱ्यांनी करावी असे आवाहनही करण्यात आले आहे नांदेड जिल्ह्यात चार संस्थांमार्फत जवळपास ६० प्रस्ताव नाफेड मार्फत खरेदी करण्याचे प्रस्ताव गेलेले आहेत परंतु अद्याप पर्यंत जवळपास ६० प्रस्तावांपैकी एकही खरेदी केंद्र सुरू करण्यास नाफेड ने मान्यता दिलेली नाही त्यामुळे शेतकऱ्याची आर्थिक पिळवणूक होत आहे शासनाचा हरभऱ्याचा हमीभाव ५३३५ रुपये आहे तर बाजारामध्ये हाच चना ४५०० रुपये भावाने व दोन ते तीन किलो कट्टी अशा पद्धतीने घेतल्या जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
या संदर्भात जिल्ह्याचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यामार्फतही संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून घेऊन तात्काळ खरेदी केंद्र सुरू करावी अशा पद्धतीचे निर्देश दिले असून नाफेड चे ब्रँच मॅनेजर मुंबई यांनाही नांदेड जिल्ह्यातील सर्वच्या सर्व प्रस्तावांना तात्काळ मान्यता देऊन नाफेडमार्फत खरेदी केंद्रे सुरू करावी अशा पद्धतीचे निर्देश खासदार चिखलीकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती देऊन नाफेड ने तात्काळ हरभऱ्याची हमीभावाने खरेदी सुरू करून शेतकऱ्यांची लूट थांबवावी अशी मागणी करित शेतकरी बांधवांनी घाई- गडबड न करता नाफेड मार्फत हरभरा खरेदी होणार असल्यामुळे हमीदरानुसारच आपला हरभरा विकावा असे आवाहनही भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य बालाजी बच्चेवार यांनी केले आहे.