नांदेड। तेलंगना राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांच्या भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएसने महाराष्ट्रात सहा विभागीय समन्वयक नेमले आहेत, अशी माहिती चेन्नुरचे आ.बी. सुमन यांनी दिली. या समन्वयकांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर भारत राष्ट्र समितीने जाळे विणन्याचे काम करावे, अशी सूचना पक्षाच्यावतीने देण्यात आली आहे.
भारत राष्ट्र समितीच्या हैद्राबाद येथील मुख्य कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, बीआरएसने नाशिक विभागाच्या समन्वयकपदी दशरथ सावंत (अहमदनगर), पुणे विभागाच्या समन्वयकपदी बाळासाहेब जयराम देशमुख (पुणे), मुंबई विभागाच्या समन्वयकपदी विजय तानाजी मोहिते (रायगड), औरंगाबाद विभागाच्या समन्वयकपदाची जबाबदारी अहमदनगरचे सोमनाथ थोरात यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तसेच अमरावती विभागाचे समन्वयक म्हणून निखील देशमुख (अमरावती) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भारत राष्ट्र समितीचे संस्थापक अध्यक्ष तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांच्या स्वाक्षरीनिशी महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, मुंंबई, औरंगाबाद, नागपूर व अमरावती या विभागातील समन्वयकांची घोषणा करण्यात आली आहे. जहिराबादचे खा. बी.बी.पाटील, चेन्नूरचे आ.बलकासुमन, बोधनचे आ.शकिल,भारत राष्ट्र समितीचे किसान सेल महाराष्ट्र अध्यक्ष माणिकराव कदम यांच्यासह इतरांनी समन्वयक निवडीसाठी मोलाची भूमिका घेतली.
—-