
केंद्रीय रस्ते तथा वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मराठवाड्यातील नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गांच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण व कोनशीला अनावरण केले. मराठवाड्यात त्यांनी दोन दिवसांचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी मराठवाड्यातील तसेच विदर्भाला जोडल्या जाणाऱ्या रस्त्यांसाठी भरभरून निधी जाहीर केला. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वयोवृद्ध भाविक तसेच दिव्यांगांसाठी देवीचे दर्शन घेता यावे यासाठी रोपवे तसेच लिफ्टची सुविधा करण्याची तरतूद त्यांनी या दौऱ्यात केली. तसेच हिंगोली जिल्ह्यातील प्रसिद्ध नरसी नामदेव येथील मंदिर परिसरातील जोड रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी जाहीर केला. गडकरी यांचा हा दौरा मराठवाड्याला पावणारा ठरला आहे.

नांदेड जिल्ह्यात २०१४ पर्यंत केवळ २५८ किलोमीटर लांबीची राष्ट्रीय महामार्गाची कामे झाली होती. परंतु सद्यस्थितीत ७६६ किलोमीटर लांबीचे रस्ते झाले आहेत . एकूण सात हजार सात कोटींची कामे मंजूर करण्यात आली असून येत्या सहा महिन्यात ही सर्व कामे पूर्ण केली जाणार आहेत. महाराष्ट्र – तेलंगणा सीमेवर असलेल्या रावी- देगलूर- आदमपूर- कारला -फुलसांगवी -माहूर अशा नवीन सात कामांची घोषणा नुकतीच गडकरी यांनी केली. या कामावर ८६५ कोटी एवढा खर्च होणार आहे. रत्नागिरी ते नागपूर अशा ६५२ किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गाला विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व कोकण या चार प्रादेशिक विभागातील ११ जिल्ह्यांना जोडण्यात आले आहे .

नागपूरच्या बुटीबोरी येथून निघालेला हा महामार्ग रत्नागिरीतील मीरा येथे संपतो. देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी आणि माहूरची रेणुका माता ही तिन्ही शक्तीपीठे या राष्ट्रीय महामार्गाने जोडण्यात आली आहेत. पंधरा पॅकेजेस मध्ये हे काम हाती घेण्यात आले आहे . महागाव ते बुटीबोरी दरम्यान तीन , मराठवाड्यात तुळजापूर पर्यंतच्या लांबीच्या पाच पॅकेजचे काम पूर्ण झाले आहे. दुर्दैवाने औसा -वारंगा- महागाव या ४४ किलोमीटर पॅकेजचे काम रखडले होते. यातील तीन कामांचे ठेकेदार बदलण्यात आले आहेत. हे काम बंद पडले होते , आता ७५ टक्के काम पूर्ण झाले असून सहा महिन्यात उर्वरित काम पूर्ण झालेले दिसेल.

मराठवाड्यात जालना हे विकासाचे मुख्य केंद्र बनले आहे तेथे जे एन एन पी टी ने आयात निर्यातीची मोठी सोय झाली आहे नवीन रोजगार निर्मितीसाठी मोठा वाव निर्माण झाला आहे जालन्याच्या धरतीवर नांदेड जिल्ह्यात काही उद्योग करता येतील का याचा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी व आमदारांनी विचार करावा अशी सूचना नितीन गडकरी यांनी मराठवाड्यातील दौऱ्यात केली. मराठवाड्यात उद्योग विकसित झाले तर कच्चामाल उपलब्ध करणे व शेतीमालाला भाव मिळण्यासाठी खूप मोठा वाव आहे.

मराठवाड्यातील नांदेड व तेलंगणाची राजधानी हैदराबाद या प्रकल्पाबाबत अनेकदा राज्य व केंद्र पातळीवर चर्चा झालेली आहे .परंतु या प्रकल्पाबाबत अद्याप पुढे प्रगती झालेली नाही .मागील राज्य सरकारच्या काळात मुंबई – नागपूर बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा विस्तारित प्रकल्प म्हणून जालना- नांदेड द्रुतगती महामार्गाची घोषणा झाली त्याचे भूसंपादन देखील सुरू आहे. परंतु नांदेड- हैदराबाद या प्रकल्पाचा निर्णय तातडीने घेऊन अंमलबजावणी झाली तर मुंबई – जालना – नांदेड – हैदराबाद असा द्रुतगती महामार्ग निर्माण होऊ शकतो. याचा फायदा महाराष्ट्र व तेलंगणा या दोन राज्यांना होईल.

परभणी जिल्ह्यातील १२८५ कोटी रुपयांच्या रस्ते कामाला मंजुरी दिल्याची घोषणा केंद्रीय रस्ते तथा वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली. चारठाणा- जिंतूर मार्गासाठी २५० कोटी, गंगाखेड – लोहा महामार्गासाठी ५०० कोटी , इंजेगाव- सोनपेठ रस्त्यासाठी २६० कोटी, इसाद -किनगाव रस्त्यासाठी १२५ कोटी, गोदावरी नदीवरील पुलासाठी १५० कोटी, गंगाखेड- लातूर महामार्गावरील आरओबी मंजूर करून गंगाखेड बाह्य वळणाच्या नियोजित कामांनाही गडकरी यांनी मंजुरी दिली.विशेष म्हणजे परभणी व गंगाखेड शहराला बाह्यवळण रस्ता आणि परभणी- गंगाखेड मार्गावरील गोदावरी नदीवर नवीन पुलाची उभारणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

परभणी भैय्या वळण रस्त्यालगतच्या गावातील जोड रस्ते पथदिवे आधी कामांसाठी पुरेसा निधी देण्याचे आश्वासन त्यांनी दिले विशेष म्हणजे परभणी बाह्यवळन रस्त्याच्या कामापाठोपाठ शहरालगतच्या दुसऱ्या बाह्यवळन रस्त्याला देखील मंजुरी देत असल्याचे त्यांनी जाहीरपणे सांगितले. या रस्ते कामासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच जिल्हा प्रशासनाने तत्काळ भूसंपादना संदर्भात हालचाली कराव्यात, जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारी जमिनींच्या भूसंपादनासंदर्भात लक्ष घालावे, कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी सरकारी जमीन रस्ते कामा संदर्भात उपलब्ध करण्या संदर्भात विचार करावा.
भूसंपादनाचे काम मार्गी लागल्यानंतर काही महिन्यात या कामांना सुरुवात करू असेही नितीन गडकरी यांनी जाहीर केल्यामुळे परभणी जिल्ह्यातील रस्त्यांना नवसंजीवनी मिळणार आहे. परभणी जिल्ह्यातून जाणाऱ्या राज्य व राष्ट्रीय महामार्गाची कामे अर्धवट कशी काय राहतात ? असा सवाल नितीन गडकरी यांनी उपस्थित केला याबद्दल गडकरी यांनी नाराजी व खंत व्यक्त केली. संबंधित कंत्राटदार, एजन्सी धारकांच्या नेहमी तक्रारी करीत त्यांना ब्लॅकमेल करण्याचे उद्योग तातडीने थांबविले पाहिजेत, अशा कानपिचक्या त्यांनी लोकप्रतिनिधींना दिल्या.
हिंगोली जिल्ह्यातील भेंडेगाव येथील उड्डाणपुलासाठी नितीन गडकरी यांनी ७५ कोटींचा निधी देणार असल्याचे जाहीर केले. हिंगोली जिल्ह्यातील मुख्य रस्ते समृद्धी महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाने जोडली जात आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील हिंगोलीसह विदर्भातील वाशिम व अकोल्याचाही विकास होणार आहे. इंदोर – जबलपूर मार्गामुळे हिंगोलीची हळद साता समुद्रपार पोहोचणार असल्याने शेतकऱ्यांनी याचा लाभ होणार आहे. शेतकऱ्यांनी याचा भविष्यात अधिक प्रमाणात लाभ घ्यावा, असेही नितीन गडकरी यावेळी म्हणाले.
कनेरगाव नाका- हिंगोली, वारंगा व रिसोड- सेनगाव या मार्गाचे लोकार्पण तसेच नरसी नामदेव येथील दहा कोटींच्या जोड रस्त्यांचे भूमिपूजन नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. भाजपच्या कार्यकाळात मराठवाड्याचा खूप मोठा विकास होत आहे. तसेच भविष्यात देखील मराठवाड्याचे रूप बदलणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हजारो कोटी रुपयांची कामे मराठवाड्यात जाहीर केल्याने भविष्यात मराठवाडा हा आगळावेगळा दिसणार, यात मुळीच शंका नाही.
…डॉ. अभयकुमार दांडगे, मराठवाडा वार्तापत्र, ९४२२१७२५५२, abhaydandage@gmail.com
