
नांदेड| सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्यांच्याविरुद्ध तक्रार घेऊन आलेल्या एका विवाहित महिलेने ठाण्यात विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात शनिवारी ही घटना घडली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांची काही वेळ धावपळ उडाली. या प्रकरणी सदर महिलेसह सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

४ मार्च रोजी एक महिला सासरच्या मंडळीविरुद्ध तक्रार देण्यासाठी शिवाजीनगर ठाण्यात आली होती. या महिलेने कर्तव्यावर असलेल्या पोलिस अंमलदाराकडे अर्ज दिला. पोलिस अंमलदार तो अर्ज वाचत असताना त्या महिलेने आपल्या पर्समधील पुडी काढून काही तरी खाल्ल्याचे पोलिस अंमलदारांनी पाहिले. सुरुवातीला आजारी असल्याने औषध घेतले असेल, असा अंदाज त्यांनी बांधला. मात्र, महिलेने सांगितले की, लग्न झाल्यापासून आजपर्यंत सासरची मंडळींकडून माझा छळ होत आहे, त्यांच्या त्रासाला कंटाळून मी उंदीर मारण्याचे औषध आताच खात आहे, असे सांगताच कर्तव्यावर असलेल्या पोलिस अंमलदारांची धावपळ उडाली. पोलिसांनी महिलेला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठवले होते.

या महिलेने यापूर्वीही दोन ते तीन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर आली. या महिलेने दिलेल्या तक्रारीवरून सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने तिच्याविरुद्धही शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात अधिक तपास पोलिस निरीक्षक मोहन भोसले मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक माने हे करीत आहेत.

