
नांदेड| विद्यार्थ्यांनी कधीही आपल्या आईचा विसर पडू देऊ नये.आईच्या डोळ्यात अश्रू न येऊ देणाराच खरा मुलगा असतो;असे सांगून जगातील सर्वात तेजस्वी चेहरा शेतकऱ्यांच्या मुलाचा असतो,असे प्रतिपादन परभणी येथील सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक डॉ.केशव खटिंग यांनी केले.

हैदराबाद मुक्तिसंग्राम अमृत महोत्सव आणि यशवंत महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त दि.२२ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान संपन्न झालेल्या यशवंत वार्षिक युवक महोत्सवाच्या बक्षीस वितरण व समारोपीय सोहळ्यात दि.३ मार्च रोजी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.

याप्रसंगी विचारमंचावर श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारणी सदस्य व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य श्री.नरेंद्र चव्हाण, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे, उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे, सूत्रसंचालक डॉ.विश्वाधार देशमुख यांची उपस्थिती होती.

डॉ.केशव खटिंग यांनी विविध कवितांचे सादरीकरण करून प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळविला. अध्यक्षिय समारोपात मा.श्री.नरेंद्र चव्हाण म्हणाले की, प्रत्येकापर्यंत ज्ञानगंगा पोचविण्याचे कार्य करणे आवश्यक आहे. भविष्यातील कालखंड हा मुलींचाच आहे. प्रत्येक स्पर्धेत व क्षेत्रात ८० टक्के मुली आहेत; ही अत्यंत आनंदाची व अभिमानास्पद बाब आहे. तरुणांनी रोजगारासाठी वेगळे प्रयत्न करण्याची आज गरज आहे. आपल्या मधील क्षमता व पात्रता वाढविल्या पाहिजे. आपण फीचर्स बघून मोबाईल विकत घेतो. त्याप्रमाणे आज माणसामधील कौशल्य बघून त्याला संधी प्राप्त होईल.

प्रारंभी प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांनी, ‘यशवंत ‘मधील युवक महोत्सव हा ज्ञानोत्सव आहे, सतत आठ दिवस विविध स्पर्धांमध्ये हा उत्सव विद्यार्थ्यांनी साजरा केला. आधुनिक जग हे वेगवान आहे. एकविसावे शतक हे ज्ञानाचे शतक असून आज संशोधनाला अत्याधिक महत्त्व आहे, असे प्रतिपादन केले.

या समारोपीय सोहळ्यात पोस्टर, मॉडेल, स्टुडन्ट सादरीकरण, देशभक्तीपर गीत गायन आणि रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले तसेच राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील क्रीडा विभागातील गुणवंतांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विश्वाधार देशमुख यांनी केले तर आभार प्रा.संगीता चाटी यांनी मानले.

बक्षीस वितरण आणि समारोपीय सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी युवक महोत्सव समिती समन्वयक डॉ. महेश कळंबकर, ग्रंथपाल डॉ.कैलास वडजे, डॉ.एम.एम.व्ही.बेग,डॉ.विश्वाधार देशमुख, डॉ.अजय गव्हाणे, डॉ.मनोज पैंजणे, प्रा.अर्जुन राऊत, प्रा.उत्तम केंद्रे,डॉ.विजय भोसले, डॉ.साहेब शिंदे, डॉ. ज्ञानेश्वर पुपलवाड, डॉ.साईनाथ शाहू, डॉ.संदीप पाईकराव,डॉ.शिवराज बोकडे, डॉ.संजय जगताप, डॉ. वीरभद्र स्वामी, डॉ. मंगल कदम,डॉ.नीता जयस्वाल, डॉ.एल.व्ही.पदमाराणी राव, डॉ.शिवदास शिंदे, डॉ.संजय ननवरे, डॉ.बालाजी भोसले, डॉ.दिगंबर भोसले,डॉ.धनराज भुरे, प्रा.गौतम दुथडे, डॉ.एल.एच. तमलुरकर डॉ.कविता केंद्रे, डॉ.प्रवीण मिरकुटे, डॉ.राजकुमार सोनवणे, डॉ.रमेश चिल्लावार, डॉ.संदीप खानसोळे, डॉ.बशीर बारी, डॉ.संभाजी वर्ताळे, डॉ.सुभाष जुन्ने, डॉ.मिरा फड, डॉ.रामराज गावंडे, डॉ.अर्चना गिरडे, डॉ.एस.एम.दुर्राणी, डॉ.सुरेश तेलंग, डॉ.अंजली जाधव, डॉ.शिवराज शिरसाट, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, कार्यालयीन अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, डी.एस.ठाकूर, श्री.राठोड, प्रशांत मुंगल, व्ही.पी.सिंग ठाकूर, संजय भोळे, जगन्नाथ महामुने, नाना शिंदे, दीपक शिवनगे आदींनी सहकार्य केले.
