नांदेड। नांदेड-जालना समृद्धी महामार्गामधील संपादीत होणार्या जमिनीचा मावेजा बाजारभावानुसार देण्यात यावा या मागणीसाठी शेतकरी कृती समिती नांदेड-परभणी-जालना येथील शेतकर्यांनी दि. 8 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांनी आंदोलनाला पाठींबा दिला.
मा. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग जालना-नांदेड जोडणारा मार्ग येथे शेतकर्यांच्या जमिनी संपादीत केल्या जात आहेत. परंतु योग्य पद्धतीचा मावेजा मिळत नसल्यामुळे शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष दासराव हंबर्डे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आंदोलन करण्यात आले. सदर मार्ग जालना-परभणी-हिंगोली या जिल्ह्यातून जात आहे. लोअर दुधना, सिद्धेश्वर, जायकवाडी आणि विष्णुपूरी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील अत्यंत सुपीक व उच्च उत्पादन क्षमता असलेल्या जमिनी संपादीत केल्या जात आहेत. परंतु याला योग्य पद्धतीचा भाव दिला गेला नाही.
त्यामुळे शेतकर्यांवर संकट आले आहे. भुसंपादन कायदा 2013 नुसार कलम 26 चा वापर करून जिल्हाधिकारी महोदयांनी जमिनीचा भाव ठरवावा, असे निर्देश आहेत. त्यामुळे जमिनीचा मावेजा बाजारभावानुसार देण्यात यावा अशी मागणी आंदोलन करून शेतकर्यांनी केली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकार्यांमार्फत सदर मागण्याची निवेदन देण्यात आले.
यावेळी शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष दासराव हंबर्डे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे दत्ता पाटील कोकाटे, मनपा माजी विरोधी पक्षनेता जीवन पाटील घोगरे, नांदेड दक्षिणचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष दत्ता पाटील तळणीकर, सामाजिक न्याय विभागाचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राहूल जाधव, शेतकरी कृती समितीचे अशोकराव मोरे, भुजंग पाटील, व्यंकोबा येडे, गजानन हंबर्डे, माजीद सेठ, संतोष मस्के, दीपक पाटील, साहेबराव कुर्हे यांच्यासह आदी शेतकर्यांची उपस्थिती होती.
राष्ट्रवादी शेतकर्यांच्या पाठीशी -डॉ. सुनील कदम
नांदेड-जालना समृद्धी महामार्गात संपादीत होणार्या जमिनीचा मावेजा बाजार भावाप्रमाणे मिळायला हवा, यासाठी शेतकर्यांच्या पाठीशी आम्ही आहोत. राज्याचे विरोधी पक्षनेता अजितदादा पवार यांच्याकडे संबंधित मागणीसाठी पाठपुरावा केला जात आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम यांनी सांगितले.
आणखी तीव्र आंदोलन करू -दासराव हंबर्डे
बाजार भावानुसार जमिनीला मावेजा सरकारने द्यावा अन्यथा याहून अधिक तीव्र आंदोलन करणार आहोत. नांदेड-परभणी-जालना येथील शेतकर्यांच्या जमिनी अत्यल्प भावाने सरकार घेत आहे. हे धोरण चुकीचे आहे. एकट्या नांदेड जिल्ह्यामध्ये 180 हेक्टर शेती संपादीत केली जाणार आहे. तर एकूण 500 हेक्टर जमिन संपादीत केली जात आहे. परंतु बाजार भावानुसार शेतकर्यांच्या जमिनीची किंमत शेतकर्याला दिली पाहिजे, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करू असे शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष दासराव हंबर्डे यांनी सांगितले.
बाजार भावानुसार मावेजा द्या -दत्ता कोकाटे
कवडीमोल शेतकर्यांच्या जमिनी घेणे चुकीचे आहे, समृद्धी महामार्गातील संपादीत होणार्या जमिनीचा मावेजा बाजार भावानुसार दिला पाहिजे. याकरीता या आंदोलनात आम्ही सहभाग घेतला आहे. सरकारने बाजार भावानुसार शेतकर्यांना मावेजा द्यावा असे मत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांनी यावेळी सांगितले.