सोनखेड। लोकमान्य महाविद्यालय, सोनखेड ता. लोहा जि. नांदेड येथील राज्यशास्त्र विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिन अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. हनुमंत आगलावे तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. आशा धुमाळ, डॉ. छाया तोटवाड, उपप्राचार्य डॉ. आनेराव एम. एम. यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता राजमाता माॅ जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
त्यानंतर डॉ. आशा धुमाळ, डॉ. छाया तोटवाड तसेच शिंदे प्रतिक्षा, तिळले वर्षा, मोरे श्रेया, वडजे शीतल, येवले गायत्री इत्यादी महिला प्रतिनिधींचा स्वरूपात पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. तद्नंतर डॉ.आर.डी. शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित डॉ. आशा धुमाळ यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी विशद करत महिला दिन हा आपल्या स्त्रीत्वाचा अभिमान बाळगून त्याचा गौरव करण्याचा इतिहास आहे,असे विचार मांडले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. हनुमंत आगलावे यांनी ‘मी नाही दासी, मी नाही देवता,मी आहे मनस्विनी, माणूस म्हणून जगते’ या काव्यपंक्तीतून समाज जीवनातील स्त्री जीवनाचे अस्तित्व अधोरेखित केले. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा. प्रा. सागुरे बालाजी यांनी तर आभार डॉ. गोविंद घोगरे यांनी मानले. यावेळी बहुसंख्य विद्यार्थी-विद्यार्थिनींची उपस्थिती होती.